पुणे : वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे सिंहगड रस्ता वाहतूक कोंडीत सापडल्याचे चित्र आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली असून पर्यायी कालवा रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. पर्यायी रस्त्यावरही वाहतूक कोंडी होत असून एक ते दीड किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तासाचा कलावधी लागत आहे. त्यामुळे हा रस्ता नको रे बाबा, अशी म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर आली असून उड्डाणपुलाचे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्नही उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.
सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृह या दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. या उड्डाणपुलाची लांबी २.७४ किलोमीटर एवढी असून पुलाची रूंदी १६.३ मीटर एवढी आहे. गेल्या दीड वर्षांपासून काम सुरू असल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून दररोज १ लाख २५ हजार वाहने ये-जा करतात, अशी आकडेवारी उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वी महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली होती. मुळातच हा रस्ता वाहतुकीसाठी अरूंद आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वी सायकल मार्ग आणि पदपथ हटवून रस्त्याची रूंदी वाढविण्यात आली होती. मात्र त्यानंतरही हा रस्ता आणि पर्यायी रस्ता वाहतूक कोंडीत अडकला आहे.
हेही वाचा >>> पुणे मेट्रोला हिरवा कंदील! पंतप्रधान मोदींच्या हस्ते केवळ उद्घाटनाची औपचारिकता
उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने क्रेन, ट्रॅक्टर, मिक्सर अशी अवजड वाहने या रस्त्यावरून धावत आहेत. टप्प्याटप्प्यात काम सुरू असल्याने काही वळणे बंद करण्यात आली आहेत. अवजड वाहनांबरोबरच पीएमपी, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस, व्हॅन, मोटारींची या रस्त्यावरून मोठी वाहतूक होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, चारचाकी गाड्या लावण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी एक ते दीड किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. मूळ सिंहगड रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असल्याचा भार पर्यायी कालवा रस्त्यावरही दिसून येत आहे. सिंहगड रस्त्याची दुरवस्था झाल्याने पर्यायी कालवा रस्त्यावरून वाहतूक होत आहे. मात्र पीएमपी वगळता अन्य मोठी आणि अवजड वाहनेही या रस्त्यावरून जात येत आहेत. त्यामुळे या रस्त्यालाही त्याचा फटका बसला आहे.
हेही वाचा >>> मुळा नदीच्या पुनरूज्जीवनासाठी ‘श्रीमंत’ पिंपरी महापालिकेचे २०० कोटींचे कर्ज
डोणजे, खडकवासला, किरकिटवाडी, नांदेड सिटी, धायरी, वडगांव, सन सिटी, माणिकबागेकडे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. काही वर्षांपूर्वी नदीपात्रातून रस्ता पर्यायी रस्ता प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार तो उखडून टाकण्याची वेळ महापालिकेवर आली. सध्या फनटाइम चित्रपटगृहालगतच्या कालव्यापासून विठ्ठलवाडीपर्यंत रस्ता विकसित करण्यात आला आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला असला तरी रस्त्याची रुंदी कमी आहे. त्यातच माणिकबाग, सन सिटी, विठठ्लवाडीकडे जाण्यासाठी हा रस्ता उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे प्रमुख सिंहगड रस्त्यावरूनच वाहतूक होत असते. प्रामुख्याने राजाराम पुलापासून धायरीपर्यंत वाहतुकीची सातत्याने कोंडी होत आहे.
रस्ता खड्डेमुक्त करण्याचा संकल्प
वाहतूककोंडी आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे दुरवस्थेच्या गर्तेत सापडलेला सिंहगड रस्ता अतिक्रमण आणि खड्डेमुक्त करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. महापालिकेने या रस्त्याचा समावेश १५ आदर्श रस्त्यांमध्ये केला असून, त्याअंतर्गत पुढील पंधरा ते वीस दिवसांत खड्डे बुजविण्यात येणार असून, रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यात येणार आहे. रस्त्याची देखभाल आणि दुरुस्तीचे काम महापालिकेच्या पथ विभागाचे आहे. त्यामुळे पथ विभागाच्या माध्यमातूनच हा रस्ता दुरुस्त केला जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.