पिंपरी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे टक्केवारीचे राजकारण जगजाहीर असताना त्यापुढे जाऊन काम देण्याच्या मोबदल्यात ठेकेदाराला थेट भागीदारी मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादीच्या दोन माजी महापौरांची अवास्तव मागणी व त्यावरून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून एका ठेकेदाराने थेट उपमुख्यमंत्री व पिंपरीचे ‘कारभारी’ अजित पवार यांच्याकडेच तक्रार केली आहे.
शहरातील उद्यान विभागाची मोठमोठी कामे करणाऱ्या आणि सत्ताधाऱ्यांनीच पोसलेल्या प्रस्थापित ठेकेदाराने अशाप्रकारे तक्रार केल्याने अनेकांचे धाबे दणादले आहे. अजितदादा हे आमचे आधारस्तंभ आहेत. मी राष्ट्रवादीचा व दादांचाच कार्यकर्ता आहे. प्रत्येक वेळी मागणी पूर्ण करूनही आपल्याला त्रास दिला जातो, असे सांगत या ठेकेदाराने सविस्तरपणे आपले दुखणे पत्रात मांडले आहे. उद्यान विभागातील कामासाठी पालिकेने ऑनलाइन निविदा मागवल्या होत्या, ती कामे आपल्याला मिळाली. खूप स्पर्धा होती म्हणून कमी दरात ही कामे करावी लागत आहेत. त्याचे विषयपत्र आयुक्तांनी स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवले आहे. मात्र, या दोन माजी महापौरांचा आपले विषय मंजूर होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहे. नियमाप्रमाणे काम मिळवूनही त्यांच्या अवास्तव मागण्यांमुळे प्रचंड अडचणी येत आहेत. या आरोपांविषयी शहानिशा करावी, स्थायी समितीला सहकार्य करण्यास सांगावे, असे या ठेकेदाराने पत्रात म्हटले आहे. ही बाब त्याने एका स्थानिक नेत्याला सांगितली होती, तेव्हा त्यांनी शहराध्यक्षांशी बोला, असे सुचवले होते. मात्र, काही मार्ग न निघाल्याने ठेकेदाराने हा प्रकार अजितदादांना लेखी स्वरूपात कळवला आहे. आपल्याला खूप त्रास होत असल्याने व तुम्ही आमचे आधारस्तंभ असल्याने तुमच्या कानावर हा प्रकार घालत असल्याचे त्याने नमूद केले आहे. आता अजितदादा नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वाचेच लक्ष आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा