‘बीएनसीए’मध्ये महापालिका अभियंत्यांसाठी कार्यशाळा

अंध, अपंग किंवा तत्सम दिव्यांगांना शहरातील रस्त्यांवर फिरताना कोणत्या अडचणी येऊ शकतात याचा अनुभव पुणे महापालिकेच्या रस्ते अभियंत्यांनी प्रत्यक्ष घेतला. अभियंत्यांनी डोळ्यांवर काळी पट्टी बांधून हातात अंधांची काळी काठी घेत फिरून पाहिले, तर व्हिलचेअरवर बसून फिरताना येणाऱ्या अडचणीही समजून घेतल्या.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर विमेन (बीएनसीए) आणि डिझाइन ब्रिज फाऊंडेशन यांच्यातर्फे दिव्यांगासाठी शहरातील रस्त्यांवर आवश्यक सुविधांसंदर्भातील कार्यशाळा नुकतीच झाली.

बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, पुणे महापालिकेच्या रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता अनिरुद्ध पावसकर आणि अपंग कल्याण आयुक्त रूचेश जयवंशी आदी या वेळी उपस्थित होते. दिव्यांगांना पूरक रस्ते आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रातील तज्ज्ञ वास्तुरचनाकार प्रा. कविता मुरुगकर, प्रा. अभिजित मुरुगकर यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातील अशा प्रकारची पहिलीच कार्यशाळा होती.

प्रा. मुरुगकर यांनी शहरात सर्वत्र झालेल्या कामातील त्रुटी, या त्रुटी दुरुस्त करून भविष्यात त्या कशा टाळाव्यात, तांत्रिक गोष्टी कशा उपलब्ध कराव्यात याबाबत मार्गदर्शन केले. ‘दिव्यांग व्यक्ती अधिकार कायदा २०१६ नुसार २०२१ पर्यंत शहरातील रस्ते आणि इमारती दिव्यांगांसाठी पूरक असणे पुणे महापालिकेसाठी बंधनकारक आहे. त्यासाठी रस्त्यांची आखणी करणाऱ्या अभियंत्यांना दिव्यांगांच्या अडचणींबाबत जागृत करण्यासाठी ही कार्यशाळा असल्याचे प्रा. कविता मुरुगकर यांनी स्पष्ट केले.

‘शहराच्या विकासकामात दिव्यांगांसह समाजातील सर्व घटकांचा विचार व्हायला हवा. अशा सर्वव्यापी दृष्टिकोनातून शहरातील पायाभूत सुविधा नव्या दृष्टीने विकसित करता येण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे,’ असे पावसकर यांनी सांगितले.