पुणे : शहरातील बाजारपेठेत दोन मैत्रिणी चहा घेत, गप्पा मारत असतात. त्यांना उतारवयात आतापर्यंत जपून ठेवलेल्या गुपितांची चर्चा करावीशी वाटते. एखाद्या दिग्दर्शकाने लघुपटाच्या माध्यमातून हा संवाद टिपायचा, तर अनेक साधनांची गरज भासते. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने कोणत्याही साधनांशिवाय, काही तासांतच हा संवाद पडद्यावर आणता येतो. त्यात कोणताही कलाकार काम करत नाही, संगीतकाराची – व्ह़ॉइस आर्टिस्टची आवश्यकता नसते, इतकेच काय, तर कोणताही कॅमेरा वापरून चित्रिकरणही केले जात नाही. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) मंगळवारी एका मिनिटाचा लघुपट ‘एआय’च्या मदतीने तयार करण्यात आला.

‘चित्रपट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ या विषयावर ‘पिफ’मध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी स्पेन येथील प्रसिद्ध दिग्दर्शक पाको टोरेस यांनी ‘एआय’चे चित्रपट क्षेत्रातील महत्त्व विषद केले. ‘‘एआय’चा वापर करून कोणत्याही साधनांशिवाय चित्रपट बनवता येतो,’ असे ते म्हणाले आणि प्रात्यक्षिकाद्वारे ते सिद्धही करून दाखवले.

आजी आणि ताई या दोन पात्रांच्या संवादावर आधारलेला ‘चाय अँड सिक्रेट’ हा एका मिनिटाचा लघुपट ‘एआय’च्या मदतीने तयार करून दाखवला. टोरेस म्हणाले, ‘आपण नव्या जगात आहोत. या जगात गोष्टी फार वेगाने घडत आहेत. चित्रपट तयार करताना ‘एआय’चा वापर करून वेग पकडता येऊ शकतो.

‘एआय’च्या वापराने अनेक गोष्टी आज नव्याने गोष्टी होत आहेत. ‘एआय’ची आता गरज निर्माण झाली आहे. असे असले, तरीही मानवी मेंदूला कोणतेही तंत्रज्ञान पर्याय ठरूच शकत नाही. मानवाला त्याच्या कल्पकतेला साकारण्यासाठी ‘एआय’सारखे तंत्रज्ञान केवळ मदत करू शकते. अखेर मानवी बुद्धिमत्तेच्या आधारेच सगळे निर्णय घ्यावे लागतात. ‘एआय’मुळे चित्रपटसृष्टीचे नुकसान होणार नाही. या उलट, फायदाच होईल. ‘एआय’चा वापर करून बॉट, टेक्स्ट, इमेज, व्हॉइस, संगीत, व्हिडिओ, पॉडकास्ट, सबटायटल, प्रोग्राम कोड तयार करता येऊ शकते. मात्र, ‘एआय’ केवळ मदतनीस आहे. महत्त्वाचे काम तुम्हालाच करावे लागणार आहे.’

Story img Loader