जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन; वस्तूचा दर्जा, प्रमाण जाणून घेण्याचा ग्राहकांना अधिकार
वस्तू निवडण्याचा, त्यांचा दर्जा व प्रमाण जाणून घेण्याचा आणि खात्री करण्याचा अधिकार ग्राहकांना आहे. याबाबत नियमबाह्य़ कृती होत असल्याचे दिसून आल्यास जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करा, असे आवाहन जिल्हा पुरवठा कार्यालयाने केले आहे.
सेवा पुरविण्याबाबत होणाऱ्या हलगर्जीपणामुळे १९६० च्या दशकात अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ग्राहक चळवळीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन. एफ. केनेडी यांनी ग्राहकांच्या प्रश्नाविषयी एक व्यासपीठ तयार केले आणि त्याबाबत जागतिक स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर युनेस्कोने त्याला मान्यता दिली. त्यानुसार दरवर्षी १५ मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो. ग्राहक दिनाच्या निमित्ताने जिल्हा पुरवठा अधिकारी दिलीप भालदार यांच्याशी ‘लोकसत्ता’ने संवाद साधला. त्या वेळी त्यांनी ग्राहक कायद्याबाबतची आणि तक्रार निवारण प्रणालीची माहिती दिली.
ग्राहकांना त्यांच्या हक्कांची आणि तक्रार निवारण प्रणालीची जाणीव होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद आहे.
त्यामध्ये अठ्ठावीस अशासकीय सदस्य असून जिल्हाभरातून ग्राहकांविषयी काम करणाऱ्या क्रियाशील सभासदांची निवड त्यामध्ये करण्यात आली आहे. अठरा विभागातील जिल्हा प्रतिनिधींच्या माध्यमातून जिल्हा तक्रार निवारण प्रणाली कार्यरत आहे. ग्राहकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक तेथे केली जाते. तसेच ग्राहक मंच जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. दिवाणी न्यायालयाची वेळखाऊ आणि क्लिष्ट प्रक्रिया असते. त्याऐवजी ग्राहक मंचाकडे ग्राहकांना तक्रारी करता येतात. मंचाअंतर्गत कोणत्याही वेगळ्या वकिलाची गरज नसते, कोणत्याही प्रकारचे शुल्क नसते. तक्रारदार आपली बाजू स्वत: मांडू शकतो. केवळ ग्राहकांशी निगडित प्रकरणे मंचाद्वारे चालविली जात असल्याने त्याचा न्यायनिवाडा लवकरात लवकर होतो, असे भालदार यांनी सांगितले.
या यंत्रणा कार्यरत आहेत, तरीदेखील ग्राहकांनी स्वत: जागरूक असणे आवश्यक आहे. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ अन्वये वस्तू निवडण्याचा, गुणवत्ता, दर्जा, प्रमाण जाणून आणि खात्री करण्याचा अधिकार ग्राहकांना आहे. एम.आर.पी. विषयी वाटाघाटी करण्याचा त्याला अधिकार आहे. त्यामध्ये नियमबाह्य़ कृती होत असल्यास दाद मागण्याचा अधिकार आहे, असेही भालदार यांनी स्पष्ट केले.
स्वारगेट येथे आज प्रदर्शन
जागतिक ग्राहक दिनानिमित्त गुरुवारी स्वारगेट येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तेथे स्टॉल लावण्यात येणार असून त्यामध्ये विविध सेवा, तक्रार प्रणालींविषयी माहिती दिली जाणार आहे. ग्राहक जागृती करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.