नृत्याच्या शिक्षणामध्ये संस्कृतीचे माहेरघर असलेले पुणे अग्रस्थानावर आहे. विविध प्रकारच्या शास्त्रीय 28nrutya1नृत्याबरोबरच पाश्चात्य नृत्याचे शिक्षण घेण्याबाबत मुलींबरोबरच मुलांमध्येही आवड वाढतेय. त्याचाच परिणाम म्हणून नृत्य शिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय भर पडत आहे. दहा मुलींपैकी किमान पाच ते सहाजणी हे शिक्षण घेतात. तर, मुलांमध्येही हे प्रमाण वाढताना दिसते. एवढय़ा मोठय़ा संख्येने नृत्याचे शिक्षण घेणारे पुणे हे कदाचित जगातील एकमेव शहर असावे.. ही निरीक्षणे आहेत शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील विविध मान्यवरांची. बुधवारी (२९ एप्रिल) साजऱ्या होत असलेल्या जागतिक नृत्यदिनाच्या निमित्ताने पुण्याचे हे वेगळेपण उठून दिसणारे आहे.
संगीत म्हणजे गायन, वादन आणि नर्तन म्हणजेच नृत्य असा त्रिवेणी संगम. गायन आणि वादनाप्रमाणेच नृत्यासाठीदेखील प्रचंड मेहनत करावी लागते. सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये शिक्षण आणि बाकी सारे व्याप सांभाळून नृत्यकलेची साधना करणाऱ्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय भर पडत आहे. पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते ते नृत्यासंदर्भात खरे आहे. कथक, भरतनाटय़म, मोहिनीअट्टम, कुचिपुडी, कथकली, ओडिसी अशा वेगवेगळ्या शास्त्रीय नृत्याबरोबरच पाश्चात्य नृत्याचेही शिक्षण देणाऱ्या किमान तीनशे-साडेतीनशे संस्था कार्यरत आहेत. हे सर्व क्लासेस आपापल्या परीने कलेची जाण वाढविण्याचे काम करीत आहेत. नृत्य शिक्षणाच्या संख्येमध्ये पडणारी भर हे समाजाच्या सुसंस्कृतपणाचे लक्षण मानले पाहिजे, अशी भावना या निमित्ताने व्यक्त झाली.
पुण्यामध्ये नृत्याची पाळेमुळे घट्ट झाली याचे श्रेय ज्येष्ठ कथक नृत्यांगना-गुरू रोहिणी भाटे यांना द्यावे लागेल. त्यांनी केलेल्या कष्टामुळेच नृत्याची संस्कृती रुजली, अशी भावना ज्येष्ठ कथक नृत्यांगना शमा भाटे यांनी व्यक्त केली. ज्या प्रमाणात विद्यार्थी नृत्य शिकायला येतात त्या प्रमाणात त्यांना शिक्षण देण्यामध्ये संस्था कमी पडतात. अनेक ठिकाणी प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी असते. औपचारिक शिक्षणाबरोबरच मुलाला एखादी कला अवगत असावी याचे भान मध्यमवर्गीय पालकांना आहे. त्यामुळेच मुली नृत्य शिकण्यास प्राधान्य देतात. नृत्यासाठी प्रचंड मेहनत आणि वेळ द्यावा लागतो हे लक्षात घेतले तर केवळ नृत्यामध्ये कारकीर्द करून उपजीविका करणे अवघड आहे. त्यामुळेच अनेक मुलींमध्ये नृत्य ही आवड राहते, असेही शमा भाटे यांनी सांगितले.
भरतनाटय़म शिकण्यासाठी १९७४ मध्ये मी पुण्याला आले तेव्हा प्रेरणा देसाई आणि सुचेता जोशी या दोघी गुरू होत्या. मात्र, आता माझ्या शिष्या यादेखील भरतनाटय़म नृत्याचे शिक्षण देत आहेत, असे डॉ. ज्येष्ठ भरतनाटय़म नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रामध्ये नृत्य विषयामध्ये बी. ए., एम. ए. आणि पीएच. डी. अभ्यासक्रम आहेत. पूर्वीच्या तुलनेमध्ये नृत्याला विपूल संधी उपलब्ध झाल्या आहेत. केवळ नृत्य सादरीकरणच नाही तर, नृत्यासाठीची प्रकाशयोजना, मुलींचा मेकअप, नृत्याचे व्हीडीओ चित्रीकरण, इव्हेंट मॅनेजमेंट, टीव्ही इन्स्टिटय़ूट अशा वेगवेगळ्या शाखा विकसित झाल्या आहेत. त्यामध्येही कारकीर्द घडवता येऊ शकते, असेही सुचेता चापेकर यांनी सांगितले.
बालगंधर्व रंगमंदिर येथे पं. गोपीकृष्ण यांचे नृत्य पाहून प्रभावित झालो आणि मी नृत्यकला आत्मसात करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली येथे पं. बिरजूमहाराज यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी गेलो त्यावेळी तेथे मुलांची आणि मुलींची संख्या समान होती. मात्र, त्यावेळी महाराष्ट्रातील मी एकमेव मुलगा होतो, असे ज्येष्ठ कथक नृत्यकलाकार पं. नंदकिशोर कपोते यांनी सांगितले. आता परिस्थितीमध्ये बदल झाला असून नृत्य शिकणाऱ्या मुलांची संख्या वाढताना दिसते, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
नृत्यामध्ये मुलींची संख्या दिसते त्या तुलनेत मुलांची संख्या अजूनही खूप कमी आहे. म्हणजे अगदी नगण्य म्हटले तरी हरकत नाही. लखनौ आणि जयपूर येथे ज्या प्रमाणात मुले नृत्य शिकतात हे ध्यानात घेतले तर महाराष्ट्रामध्ये अद्याप नृत्याची जाण विकसित झालेली दिसत नाही, असे ज्येष्ठ कथक नृत्यांगना मनीषा साठे यांनी सांगितले. मी नृत्यामध्ये कारकीर्द करायची हे सुरुवातीपासूनच ठरविले होते आणि सुदैवाने घरातून आई-वडिलांनी प्रोत्साहन दिले. माझ्या कालखंडाचा विचार करता आताच्या मुलींना कारकीर्द घडविण्यासाठी अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

नृत्याचे फायदे
– समयसूचकतेचे भान
– शरीराला होणारा व्यायाम
– कलाकारामध्ये वाढतो आत्मविश्वास
– सभाधीटपणा येतो
.
उपलब्ध होणाऱ्या संधी
– नृत्यकलेचा आविष्कार
– नृत्यकलाकारांचा मेकअप
– नृत्यासाठीची प्रकाशयोजना
– व्हीडीओ चित्रीकरण
– इव्हेंट मॅनेजमेंट आणि वाहिन्यांवरील कार्यक्रम