पुणे : मद्यपानामुळे जगभरात दरवर्षी २६ लाख जणांचा मृत्यू होत आहे. त्यात पुरुषांची संख्या २० लाख आहे. याचवेळी अमली पदार्थ सेवनामुळे दरवर्षी ६० लाख जणांचा मृत्यू होत असून, त्यातील पुरुषांची संख्या ४० लाख आहे. यामुळे मद्यपान व अमली पदार्थ सेवनामुळे पुरुषांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत अहवाल जाहीर केला आहे. जगभरात मद्यपान व अमली पदार्थ सेवनामुळे सार्वजनिक आरोग्यावर २०१९ मध्ये झालेल्या परिणामांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार, जगभरात मद्यपानाचे व्यसन असलेल्या व्यक्तींची संख्या ४० कोटी आहे. याचवेळी संपूर्णपणे मद्याच्या आहारी गेलेल्या व्यक्तींची संख्या २०.९ कोटी आहे. जागतिक पातळीवरील एकूण मृत्यूंमध्ये मद्यपानामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण ४.७ टक्के आहे. यामुळे जागतिक पातळीवर मद्यपान व अमली पदार्थ सेवनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.

हेही वाचा : अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी केला विठूनामाचा गजर…

मद्यपानामुळे होणारे मृत्यू २०१० पासून काही प्रमाणात कमी झाले आहेत. युरोप आणि आफ्रिकेत हे प्रमाण जास्त आहे. दर लिटर मद्यपानामागे मृत्यू होण्याचे प्रमाण गरीब देशांमध्ये जास्त आणि श्रीमंत देशांमध्ये कमी आहे. मद्यपानामुळे झालेल्या मृत्यूंपैकी १६ लाख जणांचा मृत्यू असंसर्गजन्य आजारांमुळे झाला आहे. त्यातील ४ लाख ७४ हजार हृदयविकारामुळे आणि ४ लाख १ हजार कर्करोगामुळे मृत्यू झाले आहेत. तसेच, अपघात, भांडण, आत्महत्या यामुळे ७ लाख २४ हजार मद्यपींचा मृत्यू झाला आहे. संसर्गजन्य रोगांमुळे २ लाख ८४ हजार मद्यपींचा मृत्यू झाला आहे.

दरडोई मद्यपानात घट

जागतिक पातळीवर दरडोई मद्यसेवनात २०१० च्या तुलनेत २०१९ मध्ये घट झाली आहे. हे प्रमाण ५.७ लिटरवरून ५.५ लिटरवर आले आहे. सर्वाधिक दरडोई मद्यसेवन युरोप खंडात ९.२ लिटर आणि अमेरिका खंडात ७.५ लिटर आहे. मद्यपान करणारा व्यक्ती दररोज सरासरी २७ ग्रॅम शुद्ध अल्कोहोल घेत आहे. हे प्रमाण वाईनचे दोन ग्लास, बिअरच्या दोन बाटल्या अथवा दोन मद्याचे प्याले एवढे आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : कांदा खरेदीचा खेळखंडोबा सुरूच; भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बदल्या, कागदपत्रे रंगवून गैरव्यवहार

अहवालातील ठळक मुद्दे

  • जगभरात दर वर्षी मद्यपानामुळे २६ लाख मृत्यू
  • मद्यपानामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये २० ते ३९ वयोगटातील व्यक्ती जास्त
  • गरीब देशांमध्ये मद्यपानामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक
  • दरडोई मद्यपान युरोपमध्ये सर्वाधिक
  • मद्यपान करणाऱ्यांतील २३ टक्के १५ ते १९ वयोगटातील
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World health organization report on drink and drugs deaths due to drinking and drugs addiction pune print news stj 05 css
Show comments