पुण्यामध्ये पहिल्यांदाच फक्त महिलांसाठी वाहतूक सेवा सुरू करण्यात येत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त के. के. ट्रॅव्हल्सतर्फे ‘नारी कॅब’ सुरू करण्यात येत असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी ही सेवा सुरू करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या ‘नारी कॅब’च्या चालकही महिलाच असतील.
फक्त महिलांसाठी असलेल्या ‘नारी कॅब’वर काम करणाऱ्या महिला चालकांना दोन महिन्यांचे खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच त्या स्वसंरक्षण करण्यास समर्थ आहेत. गाडय़ांमध्ये सुरक्षिततेसाठी ‘जी.पी.आर.एस.’ प्रणाली बसवण्यात आली आहे. या उपक्रमात ज्येष्ठ महिलांना विशेष सवलत देण्यात येणार आहे. नारी कॅबची सेवा महिला दिनापासून (शुक्रवार) सुरू होईल. ही सेवा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि गाडय़ांची खास गुलाबी रंगात सजावट करण्यात आली आहे. हा उपक्रम सुरू करणाऱ्या के. के. ट्रॅव्हल्सचे संचालक केदार कासार यांनी गुरुवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
पुण्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना एकटय़ाने घरी किंवा कामावर जाताना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांनी निर्भयतेने घराबाहेर पडावे, यासाठी ‘नारी कॅब’ महत्त्वाची ठरेल. महिलांनी ९७६७१००१०० या क्रमांकावर संपर्क केल्यास ही सेवा उपलब्ध होईल. नारी कॅबची पुणे-मुंबई-पुणे अशी सेवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा