गणपती विसर्जनाच्या वेळी निर्माल्य नदीत फेकले जाऊ नये यासाठी निर्माल्य गोळा करणारे कचरावेचक आणि स्वयंसेवक सज्ज झाले आहेत. कचरावेचकांना हातभार लावण्यासाठी विविध कंपन्या आणि संस्था पुढे आल्या असून, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीही निर्माल्य गोळा करण्याच्या मोहिमेत उत्साहाने सहभागी झाले आहेत.
पुण्यातील ‘स्वच्छ’ या कचरावेचकांच्या संस्थेने गतवर्षी शहरातील १५ नदीघाटांवर गणपती विसर्जनाच्या वेळी एकूण १७० टन निर्माल्य गोळा केले होते. या वर्षी संस्था १८ घाटांवर निर्माल्य संकलन करणार असून, ‘स्वच्छ’चे ३०० कचरावेचक निर्माल्य मोहिमेत सहभागी झाल्याची माहिती संस्थेच्या संध्या ढमाले यांनी दिली.
डी. एस. कुलकर्णी फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड या संस्था ‘स्वच्छ’च्या बरोबरीने निर्माल्य मोहिमेत उतरल्या आहेत. या संस्थांनी हाती घेतलेल्या मोहिमेत मराठवाडा मित्रमंडळाचे कॉलेज ऑफ कॉमर्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पर्यावरण विभाग, एरंडवणा स्कूल व आपटे प्रशाला येथील विद्यार्थीही भाग घेणार असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष श्याम भुर्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूडचे अध्यक्ष उज्ज्वल तावडे या वेळी उपस्थित होते.
गेल्या वर्षी या संस्थांनी ४७ टन निर्माल्य गोळा केले होते. या वर्षी २२ आणि २७ सप्टेंबरला या संस्थांचे स्वयंसेवक शहरातील प्रमुख घाटांवर निर्माल्य संकलन करणार आहे. या वेळी गरवारे महाविद्यालयाजवळचा नदीघाट, ठोसरपागा, अष्टभुजा, विठ्ठल मंदिर, बापू घाट, कमिन्स महाविद्यालय, पंडित फाम्र्स, मातोश्री वृद्धाश्रमाजवळचा नदीघाट, राजाराम पूल, बीएमसीसी आर्किटेक्चर कॉलेज या भागातील नदीघाटांवर निर्माल्य गोळा केले जाईल. गोळा केलेल्या निर्माल्याचे विलगीकरण करण्याचे काम कचरावेचक करणार आहेत. ‘नागरिकांनी निर्माल्य कापडी किंवा कागदी पिशवीत गोळा करून नदीघाटांवरील स्वयंसेवकांकडे द्यावे. या निर्माल्याचे खत बनवण्यात येणार असून ३० दिवसांनी ते नागरिकांना मोफत दिले जाईल,’ असेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

Story img Loader