इंदापूर : इंदापूर तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील सुगी सराई अंतिम टप्प्यात असतानाच, गावोगावी यात्रा- जत्रांच्या हंगामाला उत्साहात सुरुवात झाली आहे. गावोगावच्या ग्रामदैवतांच्या यात्रा, जत्रांचा हंगाम सालाबादप्रमाणे सुरू झाला असून यात्रेच्या हंगामातील प्रमुख आकर्षण असलेले कुस्त्यांचे आखाडे आता चांगलेच रंगु लागले आहेत.

ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या ग्रामदैवतांच्या यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व देतो. यात्रेसाठी वर्गणी गोळा करणे, तमाशा अथवा आर्केस्ट्रा किंवा तत्सम मनोरंजनाचे कार्यक्रम ठरवणे, कुस्त्यांच्या आखाड्याचे नियोजन करणे, नामांकित पैलवानांच्या कुस्त्या ठरवणे .अशी कामे पंधरा दिवस चालतात .आणि मग यात्रेचा दिवस उजाडतो.

तत्पूर्वी गावातून ग्रामदैवतांची पालखीतून सवाद्य मिरवणूक काढली जाते .याला छबिना म्हणतात. सर्व ग्रामस्थ मंडळी या छबिन्याला हजेरी लावतात. मंदिरासमोर विद्युत रोषणाई करून शोभेच्या दारूची आतषबाजी केली जाते. आणि मग दुसऱ्या दिवशी यात्रेचा प्रमुख दिवस असतो. याच दिवशी कुस्त्याचे जंगी मैदान भरवले जाते. या मैदानामध्ये महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून पैलवान हजेरी लावतात. अलीकडच्या काळामध्ये इंदापूर तालुक्यात पैलवानांना दिला जाणाऱ्या इनामामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

दोन हजार रुपयांपासून एक लाख रुपये इनामा पर्यंत प्रेक्षणीय कुस्त्या ठरवल्या जातात .त्यांना तसे इनाम दिले जाते .अनेक ठिकाणी मानाची गदा दिली जाते. आखाड्यामध्ये प्रेक्षणीय ठरलेल्या कुस्तीला उपस्थित कुस्ती शौकीन व्यक्तिगत इनाम देतात. मुलांच्या बरोबरीने आता कुस्ती क्षेत्रामध्ये मुलींचे प्रमाणही वाढू लागल्याचे दिसून येत आहे .तालमीमध्ये सराव केलेल्या अनेक मुली गावोगावच्या कुस्त्यांच्या आखाड्याला हजेरी लावून प्रेक्षणीय कुस्त्या करीत आहेत. त्यांनाही गाव यात्रा कमिटी कडून दिल्या जाणाऱ्या इनामाबरोबरच अनेक कुस्ती शौकीन मंडळीही चांगले इनाम देत आहेत.

गावची यात्रा म्हणजे एक प्रकारचा उत्सवच असतो.गावच्या यात्रेच्या कुस्त्यांच्या आखाड्यात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गावातील मुलांचा सन्मानही केला जातो.

अलीकडच्या काळामध्ये इंदापूर तालुक्यात बऱ्याच गावांमध्ये कुस्त्यांचे आखाडे चांगल्या पद्धतीने बांधले असल्याचे दिसून येत आहेत. तालुक्याचे आमदार तसेच खासदार आदींच्या फंडाच्या माध्यमातून आखाडे बांधण्यात आले आहेत. काही ठिकाणी कुस्ती शौकिनांनी व्यक्तिगत खर्च करून आखाडे बांधुन दिले असल्याची उदाहरणे आहेत .पळसदेव तालुका इंदापूर येथील नामांकित पैलवान हिराचंद ऊर्फ पिंटू काळे यांनी मागील काळात पळसदेव येथे स्वखर्चाने भव्य आखाडा बांधला आहे. कुस्ती हा महाराष्ट्राचा मर्दानी खेळ, पुरातन काळापासूनच कुस्तीला एक वेगळे महत्व आहे .

मागील काळामध्ये कुस्ती क्षेत्रात मुलाची संख्या कमी झाली होती.परंतु आता ठीक ठिकाणी तालमींची संख्याही वाढली आहे. त्याचबरोबर मल्लांची संख्या ही वाढलेली दिसत आहे. कुस्ती क्षेत्राला तसेच महाराष्ट्राच्या तांबड्या मातीला पुन्हा लाल दिवस येऊ लागले असून जाणीवपूर्वक आता गावोगावी कुस्ती या खेळाला चांगले महत्त्व दिले जात असल्याचे दिसून येत आहे .

कुस्तीच्या आखाड्यामध्ये कुस्त्या सुरू असताना कुस्त्यांचे समालोचन हे महत्त्वाचे मानले जाते. कुस्ती समालोचनाच्या क्षेत्रातही आता अनेक नामांकित निवेदक तयार झाले आहेत. बारामती येथील पैलवान प्रशांत भागवत हे कुस्ती क्षेत्रामध्ये मागील पाच दशकाची माहिती संकलित करून चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन करून कुस्त्यांच्या आखाड्याला चांगली रंगत आणत आहेत .प्रसिद्ध कुस्ती समालोचक पैलवान शंकर पुजारी यांचे ते शिष्य असून आता पुणे जिल्ह्याच्या भागांमध्ये प्रशांत भागवत यांचे नाव समालोचनांमध्ये घेतले जाते.

कुस्तीच्या आखाड्यामध्ये कुस्तीचे समालोचन करत असताना सुरू असलेल्या कुस्तीतील पैलवानाचे नाव, यापूर्वी त्यांनी कोणत्या मैदानात कोणाबरोबर कुस्ती केली. कोणती प्रेक्षणीय कुस्ती झाली. त्याचा कोणता डाव प्रसिद्ध आहे. तो सध्या कोणत्या डावावर खेळत आहे. आणि कुस्ती चितपट झाल्यानंतर कोणत्या डावावर कुस्ती चितपट केली. हे अगदी क्षणाक्षणाला धावते वर्णन करून आखाड्यामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे कसोटीचे काम प्रशांत भागवत नेटाने करीत असून अन्य नव्या कुस्ती समालोचकांनाही ते प्रोत्साहन देत आहेत .आपल्याबरोबर आखाड्यात नेहून कुस्ती समालोचनाचे धडे ते देत आहेत. समालोचन सुरू असतानाच उपस्थित कुस्ती शौकिनांनाही आपली मुले कुस्ती क्षेत्रामध्ये पाठवण्यासंदर्भात मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचे कामही ते करीत आहे. त्यांच्या निवेदनाला दात म्हणून अनेक ठिकाणी कुस्ती रसिक त्यांना व्यक्तिगत इनाम देत असल्याचेही दिसून येत आहे.

Story img Loader