महाराष्ट्राच्या तांबडय़ा मातीला पुन्हा चांगले दिवस येत असून, गावोगावच्या यात्रा हंगामात नामवंत मल्लांच्या कुस्त्या पाहण्यासाठी हजारो कुस्ती शौकिनांची गर्दी होत आहे. इंदापूर तालुक्यातील पळसगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या पळसनाथ यात्रेच्या कुस्त्यांच्या आखाडय़ात याचा प्रत्यय आला. या वेळी पैलवानांना एकूण पाच लाख रुपयांचे इनाम देण्यात आले.
गावोगावच्या कुस्त्यांना राज्यात उतरती कळा लागल्याचे गेल्या काही वर्षांपासून बोलले जात आहे. एक तर कुस्त्यांचे आखाडे फारसे भरत नाहीत. जे भरतात त्यांना फारशी गर्दी जमत नाही, अशी तक्रार केली जाते. मात्र, पळसदेव यात्रेत वेगळे चित्र पाहायला मिळाले. या आखाडय़ात नामवंत पैलवानांनी नेत्रदीपक निकाली कुस्त्या करून उपस्थितांची मने जिंकली. त्यासाठी हजारो कुस्तीशौकिनांबरोबरच या आखाडय़ाला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, सोनाई उद्योग समूहाचे दशरथ माने, जिल्हा बँकेचे अप्पासाहेब जगदाळे, मयूरसिंह पाटील, डी. एन. जगताप यांनाही हजेरी लावली.
क्रिकेट, फुटबॉल यासारखे खेळ, जिम यांचे तरुणाईला मोठे वेड आहे. याचबरोबर बदललेली जीवनशैली आणि नव्या पिढीच्या हाती लहान वयातच पडणारा मोबाइल आदी कारणामुळे गेल्या दोन दशकांत गावोगावच्या तालमी व कुस्ती प्रशिक्षण केंद्रे ओस पडू लागलेली होती. त्यांची अवस्था काय असणार ही चिंता अनेक मल्लांना, त्यांच्या वस्तादांना आणि कुस्तीशौकिनांना सतावत होती. मात्र, आता राजकीय नेते, गावोगावी बडे बागायतदार, व्यावसायिक यांच्याकडून आर्थिक मदत मिळू लागल्याने इंदापूर तालुक्यात या वर्षी गावोगावच्या यात्रा जत्रामधील कुस्त्यांचे आखाडे नामवंत मल्लांच्या उपस्थितीने लक्षवेधी ठरले. याचबरोबर राज्याच्या इतर भागातील यात्रा-जत्रांतील कुस्त्यांचा हंगाम पलवानांच्या मांदियाळीने गजबजल्याचेही पाहायला मिळत आहे.
इंदापूर तालुका व परिसरातही हेच पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी कुस्ती प्रशिक्षण केंद्रे उभी राहिली आहेत. त्यांना मिळालेले राजकीय पुढाऱ्यांचे पाठबळ, सहकारी साखर कारखानदारीच्या व डाळिंब-द्राक्ष-केळी बागायतीच्या पट्टय़ात शेतकऱ्यांमध्ये आलेली सुबत्ता तसेच, जुन्या पिढीतील पैलवानांकडून सढळ हाताने होत असलेली मदत यामुळे कुस्तीला प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळेच कुस्ती प्रशिक्षण केंद्रांची संख्या वाढली आहे, त्यातील पलवानांची संख्याही लक्षणीय आहे. अशाच प्रकारे पळसदेव येथील प्रसिद्ध पलवान पिंटू काळे यांनी १५ लाख रुपये खर्चून कुस्त्याचा आखाडा बांधून दिला आहे. त्याचे उद्घाटन हिंदकेसरी गणपतराव आंदळकर आणि हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
‘कुस्तीला चांगले दिवस येणार’
‘‘कुस्तीच्या प्रती असलेला जिव्हाळा आणि तांबडय़ा मातीचे ऋण काही प्रमाणात फेडण्यासाठी हा आखाडा बांधला. त्याची प्रेरणा माझे कुस्तीतील गुरू दिवंगत हिंदकेसरी हरिश्चंद्र बिराजदार यांच्याकडून मिळाली. या माध्यमातून परिसरात अनेक मल्ल तयार होत आहेत. त्यामुळे कुस्तीला पुन्हा चांगले दिवस येत आहेत.’’
– पैलवान पिंटू काळे

Story img Loader