ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांनी “मुघल सम्राट अकबर हिंदू होते,” असं मोठं विधान केलं आहे. हे सांगतानाच त्यांनी आपल्याकडे नैतिकता म्हणजे धर्म असंही नमूद केलं. तसेच अकबर, शहाजहाँच्या काळात इराणी लोक ‘हिंदू अकबरला धडा शिकवला पाहिजे’ असं म्हणायचे, असंही नेमाडेंनी नमूद केलं. ते मंगळवारी (२५ एप्रिल) एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भालचंद्र नेमाडे म्हणाले, “आपल्याकडे धर्म म्हणजे तुमची नैतिकता होय. नैतिकतेला धर्म म्हटलं जात होतं. खानेसुमारीपासून ख्रिश्चन, मुस्लीम असे धर्म सुरू झाले. त्याआधी आपल्याकडे असे धर्म नव्हते. आपण वारकरी होतो, लिंगायत होतो, कुणाची बायको महानुभव असायची, कुणी वारकरी असायचं, नाथ संप्रदायी असायचे, कुणी बौद्ध असायचे. आपल्याकडे अनेक सरमिसळी होत गेल्या. असा धर्म आपल्याकडे कधी नव्हता.”

“सिंधू नदीच्या अलिकडचे सर्व लोक म्हणजे हिंदू”

“आपल्याकडे हिंदू असणं म्हणजे सिंधू नदीच्या अलिकडचे सर्व लोक म्हणजे हिंदू होते. अकबर, शहाजहाँच्या काळात इराणी लोक ‘हिंदू अकबरला धडा शिकवला पाहिजे’ असं म्हणायचे. कारण अकबरसह सगळे हिंदूच होते. ताजमहाल बांधणाऱ्याची आई हिंदू होती. हे आपण मान्य केलं पाहिजे की, आपण सगळे एकच आहोत,” असं मत भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “आपल्याकडे लोकशाही खरंच धोक्यात, कारण खरं बोलल्यावर…”, ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत भालचंद्र नेमाडेंचं मोठं विधान

“द्वेष पसरवल्याने भारताची फाळणी”

भालचंद्र नेमाडे पुढे म्हणाले, “दुर्दैवाने मधल्या काळात हा वेगळा, तो वेगळा असं झालं. एकमेकात द्वेष पसरवण्यात आला. त्यामुळेच आपल्या देशाची फाळणी झाली. त्यातून नुकसान झालं. पाकिस्तानचे लोक युद्धावर आर्थिक खर्च करतात, आपणही खर्च करतो. दोघांचंही नुकसान होत आहे. हे या धर्म कल्पनेमुळे झालं.”

“आता धर्म आणि राष्ट्र या दोन कल्पना नष्ट केल्या पाहिजे”

“आता धर्म आणि राष्ट्र या दोन कल्पना नष्ट केल्या पाहिजे. त्या ठिकाणी नैतिकता आणि देश ठेवलं पाहिजे. धर्म आणि राष्ट्र या दोन कल्पना नष्ट केल्या तरच आपल्यासह संपूर्ण जगाची सुटका होईल. अन्यथा कठीण आहे,” असंही भालचंद्र नेमाडेंनी नमूद केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Writer bhalchandra nemade comment on mughal emperor akbar hindu religion pbs
Show comments