पुणे : चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाहीत. चित्रपटांतून समाजभान निर्माण व्हायला हवे, असे मत लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मांडले.
श्री महर्षी व्यास प्रतिष्ठानतर्फे श्री महर्षी व्यास पुरस्कार भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) हनुमंतराव गायकवाड, लालबागच्या राजाचे मूर्तिकार संतोष कांबळी यांना तर चित्रपट निर्माते राम डवरी कलागौरव पुरस्कार दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेत्री स्मिता गोंदकर यांना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे हा कार्यक्रम झाला. भिक्षेकऱ्यांपर्यंत मोफत औषधोपचार पोहचवणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिजित सोनावणे यांना श्री महर्षी व्यास विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिगंबर डवरी, विश्वस्त संजय साष्टे, संजय कपिले, रामचंद्र मोरे आदी या वेळी उपस्थित होते.
तरडे म्हणाले, ‘प्रत्येकानेच समाजाशी नाळ टिकवून ठेवणे गरजेचे आहे. त्यातल्या चांगल्या घटकांना समोर आणायला हवे. शेतकऱ्यांचा तालुका असलेला मुळशी तालुका गुन्हेगारांचा तालुका म्हणून ओळखला जात होता. मात्र, अनेक मोठी माणसे या तालुक्याने दिली आहेत. त्यामुळे गुन्हेगारांचा तालुका ही ओळख आता पुसली जाईल. शेतकरी हा अन्नदाता आहे. त्यांचे प्रश्न समजून घ्यायला हवेत.
डॉ. सोनावणे यांनी आपल्या कामाविषयी माहिती दिली. तसेच माणसाने व्यक्तिगत स्वार्थाच्या पलीकडे जाऊन समाजासाठी योगदान द्यायला हवे, अशी भावना व्यक्त केली.