पुणे : वैचारिक, चरित्रपर आणि ललित लेखनाच्या क्षेत्रात गेल्या सहा दशकांहून अधिक काळ योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. माधव पोतदार (वय ८९) यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. मुक्त पत्रकार पराग पोतदार हे त्यांचे पुत्र होत.
मराठीचे प्राध्यापक असलेले डॉ. माधव पोतदार गेली अनेक वर्षे संशोधन अभ्यासात व्यग्र होते. विविध विषयांवर त्यांनी १८३ पुस्तकांचे लेखन केले असून नुकतेच त्यांचे ‘कसे जगावे कसे रहावे’ हे १८३ वे पुस्तक प्रसिद्ध झाले होते. करोना काळात त्यांनी २० पुस्तकांचे लेखन केले. तसेच वयाच्या ८७ व्या नॅचरोपॅथीचा अभ्यासक्रम पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवले होते.
हेही वाचा – पुणे : सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आता हेल्मेटसक्तीचा दंडुका
मूळचे पेण जवळच्या लहान गावातून आलेल्या डॉ. माधव पोतदार यांनी पेणमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली. हजारो विद्यार्थ्यांना अध्यापनाच्या माध्यमातून त्यांनी ज्ञानदान केलेच. परंतु, शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर असलेल्या दोन हजार महिलांना पदवीधर करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले होते.
‘मंत्र वंदे मातरम’, ‘रामरंगी रंगले मन’ (रामदास), ‘चौदार तळे एक मुक्तचिंतन’, ‘तेजाची आरती’ ‘डॉक्टर आंबेडकरांचे सखेसोबती’, ‘राष्ट्रभक्तीची ज्वाला’ (सावरकर), ‘आचार्य अत्रे विनोद व तत्त्वज्ञान’, ‘पहिला राष्ट्रपुरुष जगन्नाथ शंकरशेट’, ‘संयुक्त महाराष्ट्रलढ्यातील शाहिरांचे योगदान’, ‘डॉ. आंबेडकरांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग’, ‘अमरशेख व्यक्ती-वाङ्मय’, ‘मोठ्यांचे मोठेपण’ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले.