नंदा खरे यांनी वृत्तपत्रीय लेखनही विपुल प्रमाणात केले आहे. वैचारिक भूमिकेशी ठाम राहून कोणतीही तडजोड न करता लेखन करणारा साहित्यिक अशीच त्यांची ओळख आहे.
ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार अनंत उर्फ नंदा खरे (वय ७६) यांचे पुण्यात दीर्घ आजाराने शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. बंगळुरू येथे वास्तव्यास असलेली त्यांची मुलगी पुण्यात पोहोचल्यानंतर खरे यांच्या पार्थिवावर शनिवारी (२३ जुलै) वैकुंठ स्मशानभूमीत सकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मराठी साहित्यातील विविध प्रांतात मोलाची भर घालणारे खरे विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टीचा पुरस्कार करणारे लेखक म्हणून ओळखले जातात. ‘अंताजीची बखर’, ‘उद्या’, ‘बखर अंतकाळाची’ या त्यांच्या कादंबऱ्या वाचकप्रिय झाल्या. मानवाच्या जडणघडणीचा साद्यंत अभ्यास करून त्यांनी सिद्ध केलेला ‘कहाणी मानवप्राण्याची’ हा ग्रंथ त्यांच्या वैचारिक लेखनाची ओळख घडवणारा ठरला आहे. नंदा खरे यांनी वृत्तपत्रीय लेखनही विपुल प्रमाणात केले आहे. वैचारिक भूमिकेशी ठाम राहून कोणतीही तडजोड न करता लेखन करणारा साहित्यिक अशीच त्यांची ओळख आहे.
नंदा खरे यांनी मानवाच्या तात्त्विक उत्क्रांतीचा सूक्ष्म तपशीलानिशी व तेवढ्याच तटस्थपणे अवलोकन करीत समाजातील विषमता आणि अज्ञानाच्या विरोधात प्रदीर्घ लेखन केले. साहित्य आणि विज्ञानाची अशक्य वाटणारी सांगड घालत त्यांनी साहित्यातले बहुस्तरीय पदर वाचकांपुढे उघड केले.
नंदा खरे मूळ नागपूरचे. शिवाजी नगरातील त्यांच्या घरी जसा कायम लेखकांचा राबता असायचा तसाच तरुण विद्यार्थ्यांच्या वैचारिक जडणघडणीचेही ते केंद्र होते. ‘सत्य दाबून ठेवण्याचा प्रकार सर्वकाळात कमी-जास्त प्रमाणात सुरुच असतो. प्रत्येकवेळी कुणीतरी खरे बोलण्याची गरज असते. जोपर्यंत सत्य बोलत राहण्याची गरज आहे, तोपर्यंत मी लिहित राहणार आहे,’ अशी भावना ते सातत्याने व्यक्त करीत. या भावनेला अनुसरूनच त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत कृती केली.
अनंत यशवंत ऊर्फ नंदा खरे हे मूळ नाव. ते व्यवसायाने स्थापत्य अभियंता. त्यांची व्यावसायिक कारकीर्द यशस्वी राहिली. त्यांनी जसे महाराष्ट्रातील अनेक वीज प्रकल्प, धरणे, पूल, कारखाने उभारण्यास मदत केली तसेच आपल्या लिखाणातून समाजाला वैचारिक नेतृत्वही प्रदान केले. माणसाच्या रोजच्या जीवन मरणाची निरीक्षणे टिपून त्यातली आर्तता अतिशय कौशल्याने लेखणातून व्यक्त केली. खऱ्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नागपुरात झाले. मॅट्रिकची परीक्षा १९६१ साली उत्तीर्ण झाल्यानंतर १९६२-६७ या काळात त्यांनी मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत स्थापत्य अभियंत्याचे शिक्षण घेतले. २००१ सालापर्यंत एका खाजगी कंपनीत ते स्थापत्य अभियंता होते. शैली आणि आशयाच्या दृष्टीने ‘अंताजीची बखर’ ही त्यांची कादंबरी विशेष गाजली. त्याशिवाय वीसशे पन्नास, वारुळपुराण, कहाणी मानवप्राण्याची, जीवोत्पत्ती आणि नंतर, डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य, ज्ञाताच्या कुंपणावरून, यासह इतर अनेक पुस्तके प्रकाशित झाली. ‘दगडावर दगड, विटेवर वीट’ या त्यांच्या आत्मचरित्राचीदेखील वाचकांनी मोठ्या उत्सुकतेने दखल घेतली. १९९३ ते २०१७ दरम्यान त्यांनी ‘आजचा सुधारक’ या विवेकवादी वैचारिक मासिकाच्या विश्वस्त मंडळावर काम केले. १९८४ ते १९९१ या कालखंडात खरे यांनी मराठी विज्ञान परिषदेला सहकार्य केले.
अन् साहित्य अकादमीचा पुरस्कार नाकारला!
२०२० साली खरे यांच्या ‘उद्या’ या गाजलेल्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला होता. परंतु, त्यांनी हा पुरस्कार नाकारला. त्यावेळी खरेंच्या या निर्णयाने मोठी खळबळ उडाली होती. राजकीय कारणातून त्यांनी हा निर्णय घेतला का, याबाबतही मोठी चर्चा रंगली होती. परंतु, नंतर खरे यांनीच याबाबत खुलासा केला होता. माझ्या या निर्णयामागे कुठलेही राजकीय कारण नाही. समाजाकडून भरपूर मिळाले आहे आणि यापुढेही काही स्वीकारत राहणे मला इष्ट वाटत नाही, त्यामुळे मी हा पुरस्कार नाकारत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
खरे यांना मिळालेले पुरस्कार
- ‘ज्ञाताच्या कुंपणावरून’ या हस्तलिखितास १९८५ साली ग्रंथालीचा विज्ञान पुस्तके/हस्तलिखिते यासाठीचा द्वितीय पुरस्कार.
- ‘वीसशे पन्नास’ या विज्ञान कादंबरीस १९९५ साली विदर्भ साहित्य संघाचा गो.रा. दोडके स्मृती वाङ्मय पुरस्कार.
- ‘कहाणी मानवप्राण्याची’ या मानवशास्त्रविषयक ग्रंथास २०१० साली महाराष्ट्र शासनाचा भाई माधवराव बागल पुरस्कार व प्रियदर्शन अकॅडमीचा वार्षिक साहित्य पुरस्कार.
- एकूण कादंबरीलेखनासाठी २०१४ साली ‘शब्द: द बुक गॅलरी’ या संस्थेचा भाऊ पाध्ये पुरस्कार.
- ‘उद्या’ या कादंबरीला २०१५ साली लोकमंगल साहित्य पुरस्कार.
प्रमुख प्रतिक्रिया
नंदा खरे साहित्य क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्त्व होते. ते मूळचे नागपूरकर होते. नागपुरातील सोन्यासारखा माणूस गेला. साहित्यिक म्हणून त्यांचे मोठे योगदान होते. कुठल्याही माणसाने पुस्तक उचलले आणि नंदा खरेंचे पुस्तक कळले असे होत नाही. त्यांचे लेखन स्वतंत्र प्रतिभेतून आणि स्वतंत्र विचार शैलीतून जन्मले होते.- महेश एलकुंचवार, ज्येष्ठ नाटककार.
नंदा खरे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. दिलदार माणूस आणि चांगला विचारवंत गेला. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले.- डॉ. गणेश देवी, ज्येष्ठ साहित्यिक.
नंदा खरे यांच्या निधनाने अगदी जवळचा माणूस गेला. बोलणे फार कठीण झाले आहे. खरे हे खऱ्या अर्थाने बुद्धिमान मराठी माणसांचे लेखक होते. त्यांनी मूल्यांशी कधी तडजोड केली नाही.-रवींद्र रुख्मिणी पंढरीनाथ, ज्येष्ठ साहित्यिक.
प्रकाशक मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर यांना अगदी काहीच दिवसांपूर्वी पाठवलेल्या मेलमध्ये नंदा खरे यांनी लिहिले आहे की, ‘२०५०’ ही कंदाबरी प्रसिद्ध होऊन तीस वर्षे उलटली. पुनर्प्रकाशित करताना त्यातील काही भाकिते खोटी ठरली आहेत, तेव्हा वाचकांची माफी मागून नव्याने काही पाने लिहितो आहे.