साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक होऊ नये. मते मिळविणे हे आमचे काम आहे. साहित्यिकांनी आमचा कित्ता गिरवू नये, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी साहित्यिकांना कानपिचक्या दिल्या. निवडणूकप्रक्रियेमुळे प्रचंड योगदान असलेले साहित्यिक अध्यक्षपदापासून दूर राहिले या वास्तवावर बोट ठेवत माजी संमेलनाध्यक्षांनी नव्या अध्यक्षांची निवड करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते शनिवारी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ कवी गुलजार, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, ललिता सबनीस, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, संदीप वासलेकर, श्रीनिवास ठाणेदार, पालकमंत्री गिरीश बापट, िपपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार रामदास आठवले, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार गौतम चाबुकस्वार, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, माजी आमदार उल्हास पवार, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील आणि भाग्यश्री पाटील यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
राज्यातील दुष्काळाबाबत पवार म्हणाले, दुष्काळाने साहित्याला खूप काही दिले. तुकारामांचे अभंग, महात्मा फुले यांचा शेतकऱ्यांचा आसूड, ह. ना. आपटे यांची ‘पण लक्षात कोण घेतो’ ही कादंबरी ही त्याची उदाहरणे आहेत. आता लेखक-कलाकारांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची वेळ आली आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून मदत केली आहे. या संमेलनाने दुष्काळात संमेलन घेताना शेतकऱ्यांचे स्मरण ठेवले. लेखणीच्या अंगी बळीराजाला झाकण्याचे बळ आले याचा आनंद आहे.
मराठी साहित्यसंमेलनाने भौगोलिक सीमा ओलांडल्या, पण साहित्याने भौगोलिक सीमा ओलांडल्या आहेत का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. वैश्विक साहित्य होण्याच्या सर्व गोष्टी मराठी साहित्यामध्ये आहेत. मराठी ज्ञानभाषा झाल्याखेरीज साहित्याचा ठसा वैश्विक पातळीवर उमटणार नाही. साहित्याचा मूळ विचार सोशल मीडियामधून गेला पाहिजे. साहित्यातून प्रश्न निर्माण केले जावेत. त्याची उत्तरेही साहित्यातूनच मिळाली पाहिजेत. नाहीतर खूप विचार, पण कृतिशून्यता उपयोगाची नाही. मराठी माणसांसाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा अजूनही सुरूच आहे, असे त्यांनी बेळगाव-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगितले.
मराठी साहित्यसंमेलनाच्या धर्तीवर देशभरातील विविध भाषांमधील लेखक, कवींचा सहभाग असलेले अखिल भारतीय बहुभाषिक साहित्यसंमेलन झाले पाहिजे, अशी अपेक्षा गुलजार यांनी व्यक्त केली. इंग्रजी शिकणे आवश्यकच आहे. आम्ही मिल्टन, शेक्सपीअर वाचतो, पण कालिदास वाचत नाही. आपल्या भाषेशी जोडून राहणे आवश्यक आहे. मराठीचा किती भाषांमध्ये अनुवाद होतो आणि अन्य भाषांतून मराठीत किती येते हेदेखील ध्यानात घेतले पाहिजे, असे गुलजार म्हणाले.

Story img Loader