वीणा गवाणकर

ऊर्ध्वगामी प्रगतीची आस प्रत्येकालाच असते. एका सामन्यात कष्टपूर्वक मिळवलेलं यश पुढे जाण्याच्या जिद्दीस प्रेरक ठरतं, ही सकारात्मक घटना म्हटली तर छोटी, परंतु एखाद्याचं आयुष्यही बदलणारी ठरते. एक खेळ, एक कोच आणि एक खेळाडू यांना कादंबरीत एकत्र गुंफून समोर ठेवण्याचं ‘चॅलेंज’ या तरुण लेखकानं घेतलं..

BAPS Swaminarayan Temple
न्यूयॉर्कमध्ये स्वामीनारायण मंदिराची तोडफोड; भिंतींवर लिहिल्या भारतविरोधी घोषणा, भारतीय दुतावासाने नोंदवला तीव्र निषेध
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
career journey of actor james earl jones
व्यक्तिवेध : जेम्स अर्ल जोन्स
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
seeing things spectral materialities of Bombay horror
‘बॉम्बे हॉरर’च्या खोलात…
Remembering iconic talk show host Phil Donahue
व्यक्तिवेध : फिल डॉनाह्यू
Panubai, textbook, first day of school, new book, book love, hope through book, joy of new book, joy, loss,
बालमैफल: नवीन पुस्तक

‘एका ध्येयवेडय़ा शिक्षकाची विलक्षण कथा’ असं बारीक टाइपमध्ये आणि ‘चॅलेंज’ हा शब्द मोठय़ा टाइपात, त्याच्याखाली सर्व ताकद गोळा करून फुटबॉलला जोरदार किक् मारण्याच्या स्थितीतल्या मुलाचे चित्र असं मुखपृष्ठ असलेल्या छोटेखानी पुस्तकाने माझं लक्ष वेधून घेतलं. आतली अर्पणपत्रिका वेगळंच काही सांगत होती, ‘‘शाळेतून बाहेर पडलेल्या, पण शाळेची आठवण न विसरलेल्या आणि तिथं पुन्हा जाण्यासाठी धडपडणाऱ्या सर्व जिद्दी मुला-मुलींना सादर, सप्रेम अर्पण.’’

शिक्षण या विषयात मला नेहमीच उत्सुकता.. या पुस्तकाची अर्पणपत्रिका पाहिल्यावर स्वाभाविकपणे माझं कुतूहल चाळवलं आणि पुढचे काही दिवस मी त्या छोटेखानी, जेमतेम १३० पानी कादंबरीत गुंतले. हा वाचनप्रवास सहज, गमतीचा असा मात्र नव्हता.

तरुण लेखक प्रतीक पुरी यांनी नागपूरकडच्या बोलीभाषेत ही कादंबरी (२०१४) लिहिलेली असली तरी ती भाषा अनोळखी, दुबरेध नाही. कथनात फापटपसाराही नाही. तरीही ती एका झटक्यात वाचून संपवता आली नाही. म्हटलं तर वर वर सहज, साधी वाटणारी घटना, मात्र ती कादंबरीच्या नायकाच्या आणि त्याच्या दोस्तांच्या आयुष्यात स्थित्यंतर घडवून आणण्याची शक्यता निर्माण करते, हे जाणवून घेताना मला बऱ्याच वेळा पुस्तक बंद करून उसंत घ्यावी लागली. असं अ‍ॅक्टिव्ह रीडिंग करायला लागणं, लावणं हीच या कादंबरीची ताकद.. हे पुस्तक वाचत असताना, ज्याचा विचारही मनाला स्पर्शून जात नाही असं चित्र डोळ्यासमोर उभं करणं मला तरी कठीण गेलं.

या कादंबरीचा नायक विनोद किशोरवयीन. हा आईचा एकुलता एक. ती घरकाम करते. विनोद भंगार गोळा करून विकतो. आईला घर चालवायला जमेल तशी मदत करतो. बाप दारूपायी लवकरच गेल्यानं आणि पैसे मिळवणं आवश्यक झाल्यानं त्याची शाळा सुटलीय. शाळा होती साधीशीच. मात्र ती त्याच्या मनात तग धरून आहे. त्या शाळेत जाऊन पुन्हा शिकायला मिळावं अशी त्याला आस आहे. तेच स्वप्न तो पाहत असतो, वास्तव मात्र त्याला धक्के देत असतं.

झोपडपट्टीतील जीवन मी बाहेरून बघितलेलं. वाचलेलं. तिथल्या भावविश्वाचा, मानसाचा, उणिवांचा फक्त अंदाज होता.. आपल्या आयुष्यात आपण ज्या बाबी सहज म्हणून गृहीत धरतो त्याच एखाद्या वंचिताला स्वप्नवत असू शकतात.

‘‘.. टमरेल घेऊन संडासाकडे निगालो. तर तिथं भली मोठी रांग.. साल्या या रांगा कधी जातील आपल्या जिंदगीतनं. कधी साला मोकळ्यानं मस्त आरामात आपल्याला संडास करता येईल देव जाने. हे सालं आपलं रोज देवाले आठवाचं कारन. देव तरी आपल्याले कशाला पावल मग. ’’

त्या रांगेत विनोदचे मित्र उभे आहेत ते पाहून विनोदला वाटतं, ‘‘सालं आपन एकटे थोडेच होतो. जीवाला म्हटलं तर बरं वाटलं.’’ .. तेवढय़ात त्याचा मित्र रांगेतली आपली जागा विनोदला देतो आणि स्वत: रेल्वेलाइनकडे जाऊ लागतो. या कृतीतून व्यक्त झालेली मैत्रीची भावना विनोदला भावते तशी वाचकालाही अंतर्मुख करते. असाच दुसरा एक प्रसंग. त्या वस्तीवरच्या मुलांचा उद्योग म्हणजे भंगार गोळा करून विकणं. एके दिवशी विनोद ‘मी आज भंगार गोळा करायला येणार नाही,’ असं म्हणतो तेव्हा बाकीच्या मुलांना आनंद होतो. कारण त्यामुळं त्यांच्या वाटय़ाला जास्त भंगार येऊन जास्त कमाई झाली असती. तो आनंदही विनोद समजून घेतो, ‘‘पैसा कोनाले नको असतो?’’

अशा अभावग्रस्त परिस्थितीत जगत असतानाही विनोदला शाळा सुटून मागे पडल्यावरही तिच्या आठवणी विद्ध करतात. सवड मिळेल तेव्हा त्या शाळेच्या मैदानात तो जाऊन बसतो. तिथं फुटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांत स्वत:ला शोधतो. खरं तर विनोदची ही मनोगतं मुळातून वाचायला हवीत.

ही भंगार वेचणारी मुलं फावल्या वेळात खेळता खेळता एकदा गंमत म्हणून वस्तीजवळून जाणाऱ्या माणसाची खोड काढतात. खोड काढली जाते ती एका फुटबॉल शिकवणाऱ्या कोचची. तो कोच तरुण आहे, उमदा आहे. विचारी आहे. त्या मुलांच्या भावनिक, शारीरिक, मानसिक गरजा तो लक्षात घेतो. त्या मुलांना- आणि मुलींनाही- शास्त्रशुद्ध फुटबॉल खेळ शिकवू लागतो. शिकवता शिकवता भल्याबुऱ्याची जाण देतो. मुलांचा आणि वस्तीवरच्या लोकांचा विश्वासही संपादन करतो. मुलांच्या समजुतीत कसा बदल घडत जातो, नव्हे त्या वस्तीवरच्या लोकांचं वर्तन, त्यांची धारणा कशी बदलत सकारात्मक होत जाते आणि शेवटी त्या शाळेतील विद्यार्थ्यांशीच अटीतटीने फुटबॉलचा सामना खेळून ही मुलं त्या शाळेचं दार स्वत:साठी कसं खुलं करून घेतात याची चित्रदर्शी भाषशैलीतील ही कहाणी जितकी रंजक तितकीच मन हळवं करणारी. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलंय, नागपूरचे विजय बारसे हे झोपडपट्टीतील मुलांसाठी ‘स्लम सॉकर’ नावाची संस्था चालवतात. एका घटनेतून त्यांनी मुलांना फुटबॉलचे शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्याच माध्यमातून पुढे त्यांच्या आजवरच्या अर्थहीन आणि दिशाहीन आयुष्याला नवं वळण दिलं. कोचचं वागणं, विचार समजून घेताना मला डॉ. मारिया माँटेसरी आठवत होत्या. त्यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना सामान्य मुलांसारखं जगता यावं म्हणून योजलेले विविध उपक्रम, दिलेले स्वयंशिस्तीचे धडे, रुजवलेली जबाबदारीची जाणीव, एक व्यक्ती म्हणून प्रत्येक मुलाविषयी दाखवलेला आदर.. कोचनं तरी दुसरं काय केलं.

प्रतीक पुरी त्या भंगार वेचणाऱ्या मुलांच्या मानसिक, भावनिक, सामाजिक विश्वाचा बारकाईनं वेध घेतात. साधीशी बाब- या सर्व मुलांना टोपण नावं होती. आणि ती त्यांच्या इतकी अंगवळणी पडलेली होती की जेव्हा फुटबॉल शिक्षक त्यांची खरी नावं वहीत नोंदवू लागतात. विनोद म्हणतो, ‘‘त्यायची खरी नावं आजच कलत होती.. आपलीच नावं ऐकताना पोरानले वेगलंच वाटत होतं काहीतरी.’’ हा फुटबॉल कोच खेळ शिकवता शिकवता त्या मुलांना काही वळण लावतोय, आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो, जबाबदारीचं भान देतो, ‘‘आज तुझ्याकडे गमवायला काहीच नाही गरिबीशिवाय, भांडणाशिवाय, अज्ञानाशिवाय.. पण कमवायला भरपूर आहे.. जे जे शिकता येईल ते शिकून घे साऱ्यांकडून.. ही एक संधी आहे असं समज.’’ हा कोच त्या मुलांना जे विचार ऐकवतो ते सार्वकालिक आणि सार्वत्रिक लागू पडतील असेच आहेत. ‘‘.. महत्त्वाचं आहे ते तुम्ही स्वत:ला बदलायला तयार आहात की नाही ते? महत्त्वाचं हे आहे की तुम्ही स्वत:ला सिद्ध करण्याची संधी देणार की नाही ते? तुम्हाला एक चांगलं आयुष्य जगायचं आहे की नाही आणि त्यासाठी तुम्ही लढायला तयार आहेत की नाही हे सर्वात महत्त्वाचं आहे.’’

त्या मुलांनी शाळेच्या विद्यार्थ्यांशी फुटबॉलचा सामना खेळावा, तो जिंकावा म्हणजे तिथल्या प्रिन्सिपॉलच्या शर्तीनुसार खेळाडू मुलांना त्या शाळेत प्रवेश मिळेल. संभाव्य पराभवाची भीती न बाळगता, मनातील न्यूनगंडावर मात करत मुलांनी खेळावं. मिळालेली संधी वाया घालवू नये यासाठी हा कोच ज्या पोटतिडकीनं बोलतो, ते तर वाचूनच अनुभवलं पाहिजे. तो म्हणतो, ‘‘.. या जगण्याची सवय नका होऊ देऊ स्वत:ला.. ही मॅच तुम्ही हरलात तरी चालेल, पण ती नाही खेळलात तुम्ही तर त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट नसेल. (तुमच्यातली) ती आग विझली तर यांच्यानंतर हा खेळच काय आयुष्यात कुठलीही गोष्ट धड करू शकणार नाही. तुम्ही स्वत:ला सिद्ध करण्याची संधी देणार की नाही.’’ कोचच्या बोलण्यावर विनोदचं मन सांगतं, ‘‘आजवर फक्त हाराची सवय होती आपल्याले. सगळीकडंच. पार इथली एक जीत आपलं लाइफ बदलून टाकणार होती. आपल्याला पुन्हा शाळेत जायला मिळणार होतं.. शिकायला मिळणार होतं. ताठ मानेनं जगात येणार होतं. गमवाले काहीच नव्हतं आपल्यापाशी, पण कमवाले खूप होतं.’’

त्या फुटबॉल सामन्यासाठी तो शिक्षक कसा सराव करून घेतो, साधनांची उणीव कशी दूर करतो, कोणत्या क्लृप्त्या दाखवतो हे सगळं लेखकानं रोचकपणे सांगितलंय. फुटबॉलच्या मागे धावण्यात नैपुण्य मिळवण्यासाठी मुलांना कोंबडी पकडण्याचा सराव करायला लावणं, फुटबॉल खेळायला, फुटबॉल शिकण्यात आणि सरावात मुलग्यांच्या बरोबरीने मुलींनीही भाग घेणं, खेळाडू मुलींना केस कापू द्यायला पालक तयार नसतात. त्या मुलींना संमती दर्शवण्यासाठी मुलग्यांना आपले केस काढून टक्कल करून घेणं वगैरे प्रसंग तर नाटय़मय, सिनेमॅटिकच आहेत. प्रतीक पुरींच्या या कादंबरीची सुरुवातच मुळी चित्रदर्शी आहे. खेळाडू गोलसाठी जोरदार किक्  मारतो. बॉल गोलकीपरच्या दिशेने जातोय.. त्यानंतर येतो मोठा फ्लॅशबॅक. सुरुवातीच्या प्रसंगात अधांतरी थांबवलेला फुटबॉल कादंबरीच्या शेवटी नेटमध्ये टाकून त्या मुलांचा ‘गोल’ आणि पुढील ‘ध्येय’ शक्यतेच्या दिशा दाखवतात. चॅलेंज घेऊन गोल साध्य करणं..

ही कादंबरी वाचत असताना मला दोन हॉलीवूड चित्रपट वारंवार आठवत होते. फार पूर्वी पाहिलेला ‘व्हिक्टरी’. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझीव्याप्त पॅरिसमध्ये दोस्त राष्ट्रांचे सैनिक युद्धकैदी असतात. ते जर्मन नॅशनल टीमबरोबर फुटबॉल सामना खेळण्याच्या मिषाने आपल्या सुटकेसाठी कशी तयारी करतात यावर होता. तर दुसरा ‘‘गोल, द ड्रीम बिगिन्स’’. लॉस अँजेलिसमध्ये हॉटेलात काम करणाऱ्या स्थलांतरित मेक्सिकन मुलाला फुटबॉलमध्ये करिअर करायचं असतं. गरिबीशी दोन हात करत जगणाऱ्या बापाचा त्याला विरोध असतो. त्या मुलाच्या खेळण्यातील नैपुण्य एका निवृत्त ब्रिटिश फुटबॉल खेळाडूच्या नजरेस येतं. तो त्याला आपल्या पंखाखाली घेतो. त्याच्यातून एक उत्तम व्यावसायिक फुटबॉल खेळाडू घडवतो. फुटबॉल खेळावर आधारित असे हे चित्रपट मला आवडले होते. एका खेळावर आधारित ही कादंबरी वेगळी वाटली ती तिच्या विषयामुळे, भाषेमुळे, मांडणीमुळे. तिच्यातील प्रत्येक पात्र त्याच्या वैशिष्टय़ांसह डोळ्यासमोर उभं राहतं. ऊर्ध्वगामी प्रगतीची आस प्रत्येकालाच असते. एका सामन्यात कष्टपूर्वक मिळवलेलं यश पुढे जाण्याच्या जिद्दीस प्रेरक ठरतं, ही सकारात्मक घटना म्हटली तर छोटी, परंतु एखाद्याचं आयुष्यही बदलणारी ठरते. एक खेळ, एक कोच आणि एक खेळाडू यांना कादंबरीत एकत्र गुंफून समोर ठेवण्याचं ‘चॅलेंज’ या तरुण लेखकानं घेतलं. परिघाबाहेरचं सामाजिक-आर्थिक-भावनिक वास्तव प्रचारकी वा नाटकी पद्धतीनं न मांडता कादंबरीच्या विषयात वैविध्य आणलं. ही सर्जकता अभिनंदनीयच.

असामान्य व्यक्तींचे चरित्र लिहून मराठी साहित्यात या प्रकाराला लोकप्रिय करण्यात मोलाचा वाटा. कृष्णवर्णीय अमेरिकन कृषिशास्त्रज्ञाच्या धडपडीची ‘एक होता काव्‍‌र्हर’ ही कहाणी चाळीसहून अधिक आवृत्त्यांमधून घरोघरी पोहोचली. ‘डॉ. आयडा स्कडर’ , ‘सर्पतज्ज्ञ डॉ. रेमंड डिटमार्स ’, ‘डॉ. खानखोजे : नाही चिरा नाही पणती’ हे महत्त्वपूर्ण चरित्रग्रंथ. डॉ. मारिया माँटेसरी यांच्या कार्याचा आढावा घेणारे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध.