पुणे : पूर्वी साहित्यिक राजकीय विषयांवर मत मांडायचे. हल्ली कोणी बोलत नाही. केवळ पुस्तके येऊन चालणार नाही. चांगले, वाईट काय हे सांगून समाजाला मार्गदर्शन केले पाहिजे. तुम्ही बोलला तरच लोक पुस्तके विकत घेतील. व्हॉट्सअपवर येतय ते खरे की खोटे? केवळ पुस्तकातून प्रबोधन होईल. इतिहास काय, याचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकार कोणाचेही असो साहित्यिकांनी राजकीय विषयांवरही बोलले पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी साहित्यिकांना केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचा समारोप राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांना राज ठाकरे यांच्या हस्ते ‘कलारत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठी भाषा मंत्री उदय सामंत, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाॅ. सदानंद मोरे, विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डाॅ. रवींद्र शोभणे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, काॅँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे संचालक राजेश पांडे या वेळी उपस्थित होते.

मराठीचे अस्तित्व पुसले गेले तर संमेलनाला अर्थ नाही. मराठी भाषा आणि संस्कृती जपा तरच जग दखल घेईल, याकडे राज यांनी या वेळी लक्ष वेधले. भाषेसाठी इतर राज्य एकत्र येतात. कावेरीच्या पाणीप्रश्नावर तमिळनाडूमध्ये चित्रपट कलाकार, साहित्यिक आणि राजकारणी असे सगळे एका व्यासपीठावर येतात. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत असते. सरकार त्यांच्या पद्धतीने काम करेल. आम्ही आमच्या पद्धतीने काम करू. या नद्यांचा संगम झाला तर मराठी माणूस आणि भाषेला धक्का लावायची कोणाची हिंमत होणार नाही, असे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. मराठीसाठी आम्ही सांगू ते करालच. पण, जे जे आम्ही करू, त्यालाही पाठिंबा द्याल, अशी अपेक्षा आहे. तेव्हा फक्त गुन्हे दाखल करू नका, अशी टिप्पणीही राज यांनी केली.

शिक्षण, धाडस, इच्छाशक्ती हीच त्रिसूत्री

शिक्षण, धाडस, इच्छाशक्ती या त्रिसूत्रीला तंत्रज्ञानाचा वापर आणि संशोधनावर भर ही जोड दिली तर मराठी तरुण उद्योग उभारणीमध्ये यशस्वी होऊ शकतात, असे मत विश्व मराठी संमेलनात रविवारी मान्यवरांनी व्यक्त केले. मराठी उद्योजकांविषयीच्या चर्चासत्रात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, बीव्हीजी ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड, सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे, गर्जे मराठीचे आनंद गानू यांनी सहभाग घेतला. ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेत संशोधन करणे महत्त्वाचे आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात खासगी क्षेत्रासाठी २० हजार कोटी रुपयांची केलेली तरतूद स्वागतार्ह आहे. ही तरतूद उद्योगांसाठी महत्त्वाची आहे. आता मराठी तरुणांनी हनुमान उडी मारली पाहिजे, असे डॉ. माशेलकर या वेळी म्हणाले.

महिलांनी अभिव्यक्त होण्याची गरज

मराठी साहित्यामध्ये महिलांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. आता अधिकाधिक महिलांनी लेखनाच्या माध्यमातून अभिव्यक्त झाले पाहिजे, असा सूर ‘मराठी भाषा आणि स्त्री साहित्य’ या विषयावरील परिसंवादात रविवारी मान्यवरांनी व्यक्त केला. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित तिसऱ्या विश्व मराठी संमेलनातील या परिसंवादात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, ज्येष्ठ लेखिका डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी सहभाग घेतला.

मराठी घरामध्ये जन्म घ्यायला भाग्य लागते. मराठीमुळेच आपली ओळख होते. मला स्वप्नसुद्धा मराठीतच पडतात. हिंदीमध्ये काम करू लागल्यानंतर ‘तू मराठीमध्ये कधी काम करणार?’, असे वडिलांनी विचारले होते. ‘लय भारी’ या माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाची सुरुवात राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने झाली. मराठी माझ्या हृदयामध्ये आहे. – रितेश देशमुख, प्रसिद्ध अभिनेते