पुणे : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर जनतेलाच पर्याय हवा असल्याचे स्पष्ट होत आहे. २०१३ मध्ये नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. त्यावेळी ते भविष्यातील पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार असतील असा विचार कोणीही केला नव्हता. देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री उत्तम काम करत असून त्यांच्याकडे पर्याय म्हणून पाहायला हरकत काय, नरेंद्र मोदींना पर्याय उपलब्ध नसण्याएवढा आपला देश कंगाल आहे का, असा सवाल माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी बुधवारी उपस्थित केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानमालेत यशवंत सिन्हा यांनी ‘करंट पोलिटिकल सिनारियो अ‍ॅण्ड मिडिया’ या विषयावर आपले विचार मांडले. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते.

यशवंत सिन्हा म्हणाले, विकासाच्या कल्पनांबाबत न बोलता धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न, नोटाबंदी या कारणांमुळे जनतेमध्ये असंतोष आहे. त्याचे पडसाद पाच राज्यांच्या निवडणूक निकालामधून उमटले. जनतेने काँग्रेसचा पर्याय स्वीकारला असला तरी आणीबाणी हा त्या पक्षाच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे हे विसरता येणार नाही, मात्र निवडणूक निकालानंतर राहुल गांधी यांनी त्याबाबत केलेले भाष्य अतिशय जबाबदारपणाचे होते ही सकारात्मक गोष्ट आहे. त्यामुळे यापुढे त्यांना पप्पू असे संबोधताना लोकांनी विचार करण्याची गरज आहे.

भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीमध्ये केवळ दोनच व्यक्तींना महत्त्व आहे. त्यामुळे इतर गुणवान व्यक्तींना तिथे कोणतीही संधी नाही. योगी आदित्यनाथ यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले असल्याने यापुढे त्यांनी केवळ आपले गोरखपूर सांभाळावे असा सल्ला सिन्हा यांनी दिला. ऊर्जित पटेल यांनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर ज्या वेगाने शक्तिकांत दास यांची नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली ते पाहता या नियुक्तीबाबत शंका उपस्थित होतात. देशाची आर्थिक परिस्थिती सध्या अत्यंत बिकट असून त्यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेची भूमिका भविष्यात अत्यंत महत्त्वाची असल्याचे सिन्हा यांनी स्पष्ट केले.

Story img Loader