खांदेपालट झाले तरी समस्या कायमच

बाळासाहेब जवळकर balasaheb.javalkar@expressindia.com

पिंपरी महापालिकेचे यशवंतराव चव्हाण रुग्णालय आणि पदव्युत्तर संस्थेचा कारभार यापुढे डॉ. पद्माकर पंडित यांच्याकडे राहणार आहे. गेल्या काही वर्षांत येथील आरोग्य सेवेची ऐशीतैशी झाली आहे. वर्षांनुवर्षे असलेले तेच प्रश्न आणि त्याच समस्या सोडवण्यात कोणालाही यश आले नाही. कित्येकांचे चरण्याचे कुरण असलेल्या चव्हाण रुग्णालयाचा कारभार सुधारण्यासाठी प्रशासकीय तसेच राजकीय पातळीवर इच्छाशक्तीच नसल्याने आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे.

पिंपरी महापालिकेच्या आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे, यात नवीन सांगण्यासारखे काही राहिले नाही. कोटय़वधी रुपये खर्च करून महापालिकेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या एकाही रुग्णालयात रुग्णांना समाधानकारक वाटेल, अशी सेवा मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. सत्ताधारी कोणीही असो, त्यावर कोणीही आणि कधीही गांभीर्याने विचार केलेला नाही. वैद्यकीय सेवेची जबाबदारी प्रामुख्याने ज्यांच्यावर होती, त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या प्रचंड हेव्यादाव्यांमुळे या विभागाचे वर्षांनुवर्षे वाटोळेच झाले आहे. सध्याचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय आणि अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्यातील सुंदोपसुंदीही त्याला अपवाद ठरली नाही. गेल्या चार वर्षांपासून असलेला त्यांच्यातील वाद काही केल्या शमण्याची शक्यता नसल्याने दोघांना बाजूला ठेवण्याचा निर्णय झाला आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएमएच) आणि पदव्युत्तर संस्थेची जबाबदारी डॉ. पद्माकर पंडित यांच्याकडे सोपवण्यात आली. डॉ. पंडित हे २५ महिन्यांपूर्वी प्रतिनियुक्तीवर आले आहेत. वैद्यकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेल्या पंडित यांच्याकडे दोन्हींची जबाबदारी दिल्याचे तीव्र पडसाद उमटले. महापालिकेचे अधिकारी बाजूला ठेवून प्रतिनियुक्तीच्या अधिकाऱ्याकडे ही महत्त्वपूर्ण जबाबदारी देऊ नये, असा सूर महापालिका सभेतही आळवण्यात आला. मात्र, ही वेळ का आली, याचा विचार व्हायला हवा. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, हे कधीतरी होणारच होते आणि अपेक्षेनुसार ते घडले.

यशवंतराव चव्हाण रुग्णालय म्हणजे समस्यांचे माहेरघर आहे. विषय समित्या, प्रभाग समित्या, स्थायी समिती, महापालिका सभा अशा अनेक ठिकाणी सातत्याने त्यावर चर्चा झाली. बैठका आणि पाहणी दौरे झाले. कारवाईचे इशारे दिले गेले. मात्र, सगळे मुसळं केरात, अशीच परिस्थिती राहिली. डॉ. दिलीप कनोज यांचा अपवाद वगळता कोणाकडेही जबाबदारी दिली तरी फरक पडला नाही. इच्छाशक्तीच नसल्याने प्रश्न कायमच भेडसावत राहिले. त्यामुळे डॉ. पंडित आल्यानंतर चमत्कार होईल, असे काही नाही. पंडित यांना स्थानिक पातळीवर अपेक्षित सहकार्य मिळणार नाही, हे उघडपणे दिसते आहे. त्यांच्याकडे सूत्रे येताच अधीक्षक-उपअधीक्षक रजेवर गेले. अनेकांनी असहकाराची भूमिका घेतली. त्यांना नगरसेवक, स्थानिक नेत्यांची ओळख नाही. बरेच अराजकीय घटकही आहेत. चव्हाण रुग्णालयाशी अनेकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. रुग्णालयांत कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाइकांची प्रचंड हेळसांड होते. अपुरे मनुष्यबळ आहे. लांब रांगा हे नेहमीचे चित्र आहे. प्रत्येक ठिकाणी रुग्णांना तासनतास रांगेतच थांबावे लागते. कधी डॉक्टर जागेवर नसतात.

अनेकदा शिकावू डॉक्टरांच्या हाती कारभार सोपवलेला असतो. कोणीच कोणाला विचारत नसल्याने सगळा आनंदीआनंद दिसून येतो. डॉक्टरांनी रुग्णांना लिहून दिलेली औषधे रुग्णालयात मिळत नाहीत. डॉक्टरांचे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लागेबांधे असलेल्या ठरावीक मेडिकल दुकानांमधूनच ही औषधे घ्यावी लागतात. बाजारात महागडी असलेली अत्यावश्यक औषधे कधीही रुग्णालयात उपलब्ध नसतात. त्यासाठी नेहमीच वेगवेगळी कारणे पुढे केली जातात. त्यामागेही छुपे अर्थकारण दडले आहे. तातडीच्या रुग्णांना सेवा मिळत नाही. रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये अपेक्षित संवाद होत नसल्याने वादाचे प्रसंग ओढावतात आणि त्यातूनच डॉक्टरांना मारहाण होण्याच्या घटना सातत्याने घडतात. हे सर्व अडथळे दूर करून नागरिकांना चांगल्या प्रकारची आरोग्यसेवा देण्याचे काम या नव्या कारभाऱ्यांना करायचे आहे.

आयोजक तेच आणि सत्कारही त्यांचाच

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत चिंचवडला झालेल्या ‘आठवणीतील मुंडे’ कार्यक्रमाच्या निमित्ताने पिंपरी शहर भाजपमधील वातावरण पुन्हा ढवळून निघाले. या कार्यक्रमाला एखाद्या मेळाव्याचे स्वरूप आले होते. भाजपचे सर्व गट एकत्र आले, तरी बरीच धुसफूसही जाणवली. मुंडे यांचे निकटवर्तीय राज्यसभा खासदार अमर साबळे उपस्थित नव्हते. ते सोलापूर दौऱ्यावर असल्याचे साबळे समर्थकांकडून सांगण्यात आले. आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे गैरहजर होते. आमदार लक्ष्मण जगताप, पक्षनेते एकनाथ पवार हे असून नसल्यासारखे होते. भाजपच्या असंतुष्ट ओल्ड इज गोल्ड गटाने वेगळे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला. प्रमुख आयोजक सदाशिव खाडे यांच्या एककल्ली कारभाराविषयी नाराजीचा मोठा सूर होता. आयोजक तेच आणि त्यांचाच सत्कार असे चित्र होते. भाजप कार्यकर्त्यांसह बीड-परळीच्या अनेकांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले असताना सबकुछ खाडे असे बिंबवण्याचा प्रयत्न झाला. प्रचंड गर्दीमुळे नियोजन कोलमडले. कोणीच कोणाचे ऐकत नव्हते. यामध्ये निवेदकाची फरफट झाली.

 

 

Story img Loader