देशात दरवर्षी स्तनांच्या कर्करोगाचे सव्वा लाख नवीन रुग्ण सापडतात. या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही पन्नास टक्के आहे. ‘ब्रेस्ट कॅन्सर इंटरनॅशनल ग्रुप’चे सल्लागार डॉ. जी. एस. भट्टाचार्य यांनी ही माहिती दिली. ‘ब्रेस्ट कॅन्सर फाउंडेशन- इंडिया’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्तनांच्या कर्करोगावरील राष्ट्रीय परिषदेत शनिवारी भट्टाचार्य यांनी ही आकडेवारी सांगितली.
भट्टाचार्य म्हणाले, ‘‘ शहरात दर पंचवीस स्त्रियांमागे एका स्त्रीला स्तनांचा कर्करोग आढळतो. तर ग्रामीण भागात हे प्रमाण साठ स्त्रियांमागे एक रुग्ण असे आहे. चाळिशीच्या आतील स्त्रियांमध्ये या रोगाचे प्रमाण वीस ते सव्वीस टक्के आहे. पूर्वी हेच प्रमाण चौदा ते अठरा टक्के होते. सत्तर टक्के रुग्ण रोगाच्या शेवटच्या टप्प्यातच उपचारांसाठी येत असल्याने या कर्करोगाचा मृत्युदरही मोठा आहे.’’
‘इंडियन सोसायटी ऑफ मेडिकल अँड पेडिअॅट्रिक आँकोलॉजी’चे उपाध्यक्ष डॉ. अनंतभूषण रानडे म्हणाले, ‘‘मुलींमध्ये लवकर वयात येण्याच्या प्रमाणात झालेली वाढ, लग्नाचे वाढलेले वय, वाढत्या वयातील प्रसूती, स्थूलपणा, व्यायामाचा अभाव या गोष्टी स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. महिलांनी स्तनांच्या कर्करोगाविषयीची तपासणी स्वत:ची स्वत: करायला शिकून घेण्यामुळे रोगाचे निदान लवकर होऊन वेळीच उपचार करणे शक्य होईल.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा