येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात एक वर्षांहून अधिक काळ उपचार घेतलेले (लाँग स्टे) आणि आता आजार आटोक्यात असलेले वीस मनोरुग्ण बाहेरच्या जगासाठी सज्ज होत आहेत. मनोरुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या ‘देवराई’ या ‘ट्रान्झिट होम’ला दहा महिने पूर्ण झाले असून केवळ कागदी पिशव्या आणि सिरॅमिकचे मणी बनवणेच नव्हे, तर मनोरुग्णालयाच्या बाह्य़रुग्ण विभागात कॉफी मशिन चालवणे, मशिनवर कागदाचे चकचकीत द्रोण तयार करणे, रोपवाटिकेत रोपे तयार करणे ही कामेही हे रुग्ण करत आहे. विशेष म्हणजे हा कक्ष सुरू झाल्यानंतरच्या कालावधीत तिथे राहणारे पाच मनोरुग्ण घरी देखील गेले आहेत.
ऑक्टोबर २०१४ मध्ये येरवडा मनोरुग्णालयात ‘देवराई’ हा वीस खाटांचा ‘ट्रान्झिट होम’ कक्ष सुरू करण्यात आला. ‘इनसेन्स’ (इंटिग्रेटेड कम्युनिटी केअर रीलेटेड टू नीड्स ऑफ पीपल विथ सिव्हिअर मेंटल डिसॉर्डर्स) या प्रकल्पाअंतर्गत ‘परिवर्तन’ या संस्थेतर्फे हा कक्ष चालवला जात असून त्याला टाटा ट्रस्टचे आर्थिक साहाय्य आहे.
अनेक मनोरुग्ण मनोरुग्णालयात अनेक वर्षांपासून उपचार घेत असतात. मनोरुग्णालयात राहताना जगाशी संपर्क तुटल्यामुळे या रुग्णांना समाजात परत गेल्यावर दैनंदिन जीवनातील लहान-लहान गोष्टीही नव्याने शिकाव्या लागतात. स्वत: काम करून पैसे कमावणे आणि पैशांचा विनियोग करण्याचे कौशल्यही शिकावे लागते. ही कौशल्ये देवराईत राहणाऱ्या मनोरुग्णांना शिकवली जात आहेत. यातल्या ज्या मनोरुग्णांचे कुटुंब अज्ञात आहे ते शोधण्यासाठीही प्रयत्न केला जात आहे. प्रकल्पाच्या वैद्यकीय सेवा समन्वयक जाई अडावदकर म्हणाल्या, ‘मानसिक आजारावरील उपचारांनंतर समाजात जाऊन राहण्यास तयार असलेले २० रुग्ण सध्या देवराई कक्षात राहत असून २ ते ५ वर्षांपासून मनोरुग्णालयात राहणारे पाच रुग्ण या कक्षात राहून तिथून स्वत:च्या घरी गेले आहेत. देवराई कक्षात येणारे जवळजवळ सर्व रुग्ण छिन्नमानसिकता (स्किझोफ्रेनिया) किंवा ‘बायपोलर मूड डिसऑर्डर’ या आजारावर दीर्घकाळ उपचार घेणारे आहेत.’
समन्वयक शमिका बापट म्हणाल्या, ‘मनोरुग्णालयात असलेल्या रुग्णांनी केलेल्या कामाचे थेट पैसे त्यांना देता येत नाहीत, मात्र रुग्ण घरी जाताना त्यांना हे पैसे दिले जातात. सध्या मनोरुग्णालयात बऱ्याच काळापासून राहणाऱ्या दोनशे रुग्णांची आधार कार्डे काढण्यात आली आहेत. त्या आधारे त्यांची जनधन योजनेअंतर्गत बँक खाती उघडणे व त्यांच्या कमाईचे पैसे त्यात जमा करणे या विषयी शासनाशी बोलणी सुरू आहेत.’

‘ सध्या मनोरुग्णालयात ५ वर्षांहून अधिक काळ राहत असलेले ३०० ते ३५० रुग्ण आहेत. ‘देवराई’ कक्षात राहणाऱ्या रुग्णांची संख्या ६० पर्यंत वाढवणे शक्य असून हा कक्ष चालवणाऱ्या संस्थेस तशी सूचना केली आहे. मनोरुग्णांसाठी सामाजिक संस्थांतर्फे मनोरुग्णालयाच्या बाहेर ‘हाफ वे होम’ चालवण्याची संकल्पनाही विचाराधीन आहे.’
– डॉ. भालचंद्र डोंगळीकर, मनोरुग्णालय अधीक्षक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा