पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केलेल्या गजा मारणे टोळीतील गुंडांनी येरवडा कारागृहात राडा घातला. एकाच्या डोक्यात पाट घातल्याने तो गंभीर जखमी झाला. येरवडा कारागृहात वेगवेगळ्या बराकीत मोक्का कारवाई केलेले वेगवेगळ्या टोळीतील गुंड ७०० ते ८०० आहेत. मोक्का कारवाई केलेले गुंडन्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद सुरू असतात. कारागृहात बुधवारी दुपारी कॅरम खेळत असताना कैद्यांमध्ये वाद झाला. त्यावेळी कारागृहातील रक्षकांनी भांडणे सोडवली. त्यानंतर सर्वांना बराकीत बंद करण्यात आले होते.
रात्री तपासणी सुरू असताना गुंडांच्या टोळीमध्ये पुन्हा वाद उफाळून आला. यावेळी एकाने दुसऱ्या टोळीच्या गुंडाच्या डोक्यात पाट घातल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला. कारागृह रक्षकांनी भांडणे सोडवली आणि त्यानंतर सर्व गुंडांची वेगवेगळ्या बराकीत रवानगी करण्यात आली. रात्री कारागृहात कैद्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यात एक जण जखमी झाला आहे. त्या कैद्यांना आता वेगवेगळ्या बराकीत ठेवण्यात आले आहे. त्यांचे जबाब घेऊन कायदेशीर तक्रार दाखल करण्यात येणार आहे, असे येरवडा कारागृहातील अधीक्षक राणी भोसले यांनी सांगितले.