तब्बल सोळाशे ते अठराशे रुग्णांची जबाबदारी असलेल्या येरवडा मनोरुग्णालयात अजूनही सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेलेले नाहीत. इतकेच नव्हे तर मनोरुग्णालयातील अंतर्गत दूरध्वनी सुविधा (इंटरकॉम) देखील बहुतेक वेळा बंदच असल्याची माहिती समोर आली आहे. या मनोरुग्णालयातील काही रुग्णकक्षांमध्ये प्रत्येकी दोनशे-दोनशे रुग्ण दाखल असताना त्यांच्यावर देखरेख ठेवण्यांसाठी साध्या सुविधांचाही अभाव असल्यामुळे रुग्णांच्या तसेच तिथे काम करणाऱ्या डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
नोव्हेंबर २०१३ मध्ये मनोरुग्णालयातील एका रुग्णाने रागाच्या भरात केलेल्या मारहाणीत इतर दोन मनोरुग्णांचा मृत्यू झाला होता. या वेळी मनोरुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर मनोरुग्णालयात ३८ ठिकाणी हे कॅमेरे बसवले जावेत असे ठरले व त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली. मात्र पुन:पुन्हा निविदा प्रक्रिया राबवूनदेखील त्याला प्रतिसाद मिळाला नाही आणि अखेर कॅमेरे बसवले गेलेच नाहीत.
इंटरकॉमची सुविधा तर मनोरुग्णालयात गेल्या ३ ते ४ वर्षांत कधीच पूर्ण क्षमतेने सुरू नव्हती, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मनोरुग्णालयात पुरुष रुग्णांसाठी १० व स्त्री रुग्णांसाठी ७ कक्ष आहेत. रुग्णालयाचेआवारही लांबवर पसरले आहे. इंटरकॉम चालत नसल्यामुळे मनोरुग्णाला झटका येणे, फीट येणे, रुग्ण आजारी असणे असे निरोपही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष चालत जाऊन पोहोचवणे भाग आहे. डॉक्टरांना बोलावणे किंवा मनोरुग्णांना हलवण्यासाठी कोणत्या रुग्णकक्षात जागा रिकामी आहे हे पाहणे अशा किरकोळ कामांसाठीही हेलपाटे घालावे लागतात. विशेषत: प्रत्येक आया किंवा मावशींकडे दुचाकी नसल्यामुळे त्यांना एका कक्षातून दुसऱ्या कक्षात डॉक्टरांना शोधत पायपीट करावी लागते.
मनोरुग्णालयात बऱ्याच ठिकाणची इंटरकॉम सुविधा सुरू नसल्याबद्दल मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भालचंद्र डोंगळीकर यांनी दुजोरा दिला. कॅमेऱ्यांच्या प्रश्नाबद्दल ते म्हणाले, ‘‘मी पदभार स्वीकारून काहीच दिवस झाले असून अधिक माहिती घेतल्यानंतरच याविषयी बोलता येईल.’’
सीसीटीव्हीसाठीच्या प्रक्रियेची नव्याने सुरूवात
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठीची प्रक्रिया अधीक्षक स्तरावर एप्रिलपासून पुन्हा राबवली जाईल, असे आरोग्य उपसंचालक डॉ. एच. एच. चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘आंतररुग्णांचे कक्ष, स्वयंपाकघर, कपडे धुलाईची जागा अशा सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेस प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसवता आलेले नाहीत. प्रथम अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात कॅमेरे बसवण्याचा प्रयत्न असेल.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा