येरवडा मनोरुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांनाही डॉक्टरांच्या प्रतीक्षेत तासन् तास थांबावे लागत असल्याचे चित्र आहे. बऱ्याच वेळाच्या प्रतीक्षेनंतर डॉक्टर येतात खरे, पण अवघ्या काही मिनिटांतच खचाखच भरलेली ओपीडी हातावेगळी करण्याकडे त्यांचा कल असल्यामुळे मनोरुग्णांना धड समुपदेशनही केले जात नसल्याची रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार आहे.
सकाळी साडेनऊ ते दीड या वेळात मनोरुग्णालयाचा ओपीडी विभाग चालतो. या वेळात किमान एका डॉक्टरने सतत तेथे उपस्थित राहणे अपेक्षित आहे. सध्या दररोज कागदोपत्री दोन मानसोपचार तज्ज्ञांना ओपीडीचे काम नेमून दिले आहे. परंतु बऱ्याचदा कोणत्यातरी एकाच डॉक्टरांच्या जीवावर हा विभाग चालतो. डॉक्टरांकडे वॉर्डमधील कामही सोपवलेले असल्यामुळे ओपीडीतील डॉक्टर वॉर्डात गेले की ओपीडीत रुग्णांना ताटकळत बसावे लागते.
मनोरुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘विशेषत: सोमवारी आणि शुक्रवारी मनोरुग्णालयात तपासून घ्यायला जाणे म्हणजे रुग्ण आणि नातेवाईकांसाठी शिक्षाच असते. मनोरुग्णांना तपासताना त्यांच्याशी व त्यांच्या नातेवाईकांशी सविस्तर बोलून रुग्णांच्या आजारात काही फरक पडला आहे का, त्यांना औषध बदलून देण्याची गरज आहे का, या सर्व गोष्टींचा डॉक्टरांनी विचार करणे अपेक्षित असते. परंतु येरवडा मनोरुग्णालयात रुग्णांना तपासण्यासाठी डॉक्टर पुरेसा वेळच देत नाहीत. अशा वेळी रुग्णाच्या नावापुढे ‘सीटी ऑल’ (कंटिन्यू ऑल) असे लिहून रुग्ण झटपट हातावेगळे करण्याकडे डॉक्टरांचा कल असतो. मानसिक रुग्णांच्या आजाराबद्दल नातेवाईकांना पूर्ण माहिती देणे व त्यांनी रुग्णाला कसे वागवावे याबाबत त्यांचे समुपदेशन करणे हा उपचारातील महत्त्वाचा भाग असतो. या प्रकारचे कोणतेच समुपदेशन मनोरुग्णालयात होत नाही. अनेकदा नातेवाईकांना रुग्णाला काय आजार आहे हेही सांगता येत नाही.’
याबाबत विचारले असता मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विलास भैलुमे म्हणाले, ‘‘ओपीडीबाबत माझ्यापर्यंत तक्रारी आलेल्या नाहीत. परंतु ओपीडी पाहणाऱ्या डॉक्टरांनाच वॉर्डमधील कामही पाहावे लागते. त्यामुळे डॉक्टरांना काही काळ ओपीडी सोडून वॉर्डमधील राऊंडसाठी जावे लागू शकते. नेहमी दोन मानसोपचार तज्ज्ञ ओपीडीमध्ये असतात. या दोन डॉक्टरांपैकी एकाने ओपीडीच्या वेळात कायम तिथे थांबणे अपेक्षित आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा