वर्षांनुवर्षे मनोरुग्णालयात राहिल्यामुळे बाहेरच्या जगापासून संपर्क तुटलेल्या मनोरुग्णांना पुन्हा समाजात मिसळणे सोपे होणार आहे. ‘परिवर्तन’ या सामाजिक संस्थेच्या साहाय्याने येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांच्या पुनर्वसनाचा प्रयोग साकारत असून यात मानसिक आजारातून बरे होण्याच्या मार्गावर असलेल्या मनोरुग्णांना मनोरुग्णालयातच राहून दररोज बाहेर जाऊन काम करण्याचीही संधी मिळू शकेल.
मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विलास भैलुमे यांनी ही माहिती दिली. येरवडा मनोरुग्णालयात एक वर्षांपेक्षा अधिक काळ राहणारे (लाँग स्टे) ७०० ते ७५० रुग्ण आहेत. २० ते ३० वर्षांपासून मनोरुग्णालयातच राहणाऱ्या काही रुग्णांचाही यात समावेश आहे. कुटुंबाचा पत्ताच नसल्यामुळे तसेच, कुटुंब त्यांना स्वीकारण्यास तयार नसल्यामुळे हे मनोरुग्ण घरी जाऊ शकत नाहीत. तर, मानसिक आजाराची लक्षणे तीव्र असल्यामुळेही यातील काहींना मनोरुग्णालयातच राहावे लागते. ‘बऱ्याच वर्षांपासून मनोरुग्णालयातच राहणाऱ्या रुग्णांना समाजात आणण्यासाठी दोन टप्प्यांवर प्रयत्न होणार असून त्यांच्या पुनर्वसनासाठी तसेच पुढील टप्प्यावर समाजात जाण्यास तयार असणाऱ्या मनोरुग्णांसाठी वेगळ्या पद्धतीचे वॉर्ड तयार करण्यात आले आहेत,’ असे डॉ. भैलुमे यांनी सांगितले.
या वॉर्डस्ची रचना मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी पूरक व्हावी यासाठी तसेच मनोरुग्णांना समाजात पुन्हा मान्यता आणि व्यवसाय मिळवून देण्याच्या प्रक्रियेतही ‘परिवर्तन’ संस्था मनोरुग्णालयाला मदत करत आहे. संस्थेचे प्रकल्प समन्वयक आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, ‘‘पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यासाठी एक वर्षांपेक्षा अधिक काळ मनोरुग्णालयात असलेल्या ६० मनोरुग्णांची निवड करण्यात आली आहे. ३० मनोरुग्णांसाठी एक याप्रमाणे दोन वॉर्ड (लाँग स्टे वॉर्ड) त्यांच्यासाठी वेगळे ठेवण्यात आले असून तिथे या मनोरुग्णांच्या कौशल्य विकसनासाठी प्रयत्न करण्यात येतील. यातून जे मनोरुग्ण समाजात जाण्यासाठी तयार होतील अशा ४ जणांसाठी एक लहान ‘ट्रान्झिट वॉर्ड’ तयार करण्यात आला आहे. या ट्रान्झिट वॉर्डमध्ये राहून या मनोरुग्णांना दररोज बाहेर जाऊन काम करण्याची संधी मिळावी असा प्रयत्न आम्ही करत आहोत. सर्वच मनोरुग्ण कदाचित बाहेर जाऊन काम करू शकणार नाहीत. तरीही त्यांना समाजाच्या अधिक जवळ नेणारे वातावरण या वॉर्डात मिळू शकेल. या मनोरुग्णांची आवड-निवड, त्यांची वैयक्तिकता या गोष्टींना या ठिकाणी वाव मिळू शकेल.’’
मनोरुग्णांना मनोरुग्णालयातच राहून बाहेर जाऊन काम करता येईल का, हे मनोरुग्णालयाची अभ्यागत समिती ठरवणार असल्याचे डॉ. भैलुमे यांनी सांगितले. जर या समितीने अशी परवानगी नाकारली तर पुनर्वसन प्रकल्पातील मनोरुग्णांना मनोरुग्णालयाच्याच बाह्य़रुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना चहा- बिस्किटे विकणारे लहानसे उपाहारगृह सुरू करून देता येईल का, या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. भैलुमे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा