महापालिका भवनासमोर वाहने उभी करण्यास मनाई असतानाही तिथे वाहने लावणाऱ्यांवर कारवाई करू आणि त्या ठिकाणची वाहतूक सुरळीत राहील याची काळजी घेऊ, असे आश्वासन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी ‘पुणे वृत्तांत’शी बोलताना दिले.
पालिकेत येणाऱ्या माननीयांची वाहने या ठिकाणी उभी केल्यामुळे तिथे वाहतुकीचा खोळंबा होतो. तिथे वाहने उभी करण्यास मनाई असतानाही वाहनांच्या दोन-तीन रांगा लागलेल्या असतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे त्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न ‘पुणे वृत्तांत’च्या माध्यमातून व्यक्त केला होता. त्यावर पांढरे म्हणाले की, महापालिकेत येणाऱ्या मोटारींना लावण्यासाठी पार्किंग’ची व्यवस्था नाही. या ठिकाणी येणाऱ्या मोटारी समोरील रस्त्यावरच पार्किंग’ केल्या जात आहेत. वाहनांना पार्किंग’साठी जागा नसल्यामुळे महापालिकेसमोरील रस्त्यावर होणाऱ्या पार्किंग’कडे आम्ही थोडे दुर्लक्ष करत होतो. त्याच बरोबर या रस्त्यावर दुहेरी पार्किंग’ होऊन वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेतली जात होती. पण, आता रस्त्यावर मोटारी लावणाऱ्यांवर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाईल. या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये म्हणून एका वाहतूक पोलिसाची नेमणूक केली जाते.
उपाय सुचवलाय, पण..
या ठिकाणी मूळ प्रश्न हा पार्किंगच्या व्यवस्थेचा आहे. महापालिकेत येणाऱ्या नागरिकांना वाहने उभी करण्यासाठी व्यवस्था करण्यास प्रशासनाला सांगितले आहे. महापालिको इमारतीच्या  पाठीमागील बाजूस असलेल्या जागेत ‘बहुमजली पार्किंग’ ची सुविधा निर्माण करू शकते. तसे झाले तर रस्त्यावर वाहने लावली जाणार नाहीत. या बहुमजली पार्किंगच्या सूचनेला महापालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर समस्या सुटेल, असे पांढरे यांनी सांगितले.

Story img Loader