शेतक ऱ्यांच्या दुर्दशेला स्वत: शेतकरी, निसर्ग किंवा बाजारपेठ जबाबदार नसून सरकारची धोरणे व त्यांचा दृष्टिकोन कारणीभूत असल्याची टीका स्वराज अभियानचे प्रवर्तक प्रा. योगेंद्र यादव यांनी आकुर्डीत बोलताना केली. भूमिअधिग्रहण कायदा रद्द झाला पाहिजे, असे सांगताना एक टक्के शेतक ऱ्यांनाही या कायद्याची पुरेशी माहिती नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘स्वराज अभियाना’अंतर्गत यादव यांचा रविवारी पिंपरी-चिंचवड दौरा होता, या वेळी आकुर्डीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी प्रा. आनंद कुमार, मारूती भापकर, मानव कांबळे आदी उपस्थित होते. प्रा. यादव म्हणाले, ‘स्वराज’ या राष्ट्रव्यापी अभियनाअंतर्गत ‘जयकिसान’ आंदोलन होणार आहे, त्याची सुरूवात पंजाबमधून झाली आहे. ३१ जुलैपर्यंत चालणाऱ्या अभियानात एक लाख गावांमध्ये जाण्याचे नियोजन आहे. त्याद्वारे शेतक ऱ्यांचे प्रबोधन करणार आहे. शेतक ऱ्यांच्या दुर्दशेला सरकारची धोरणे जबाबदार आहेत, याविषयी शेतकऱ्यांमध्ये जागृती करणार आहे. शेतक ऱ्यांच्या उत्पन्नाची हमी देण्यासाठी स्वतंत्र आयोग हवा, नैसर्गिक आपत्तीनंतर मदत करण्याच्या सध्याच्या नियमांमध्ये बदल करावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. जातीय सलोखा बिघडू नये, यासाठी समित्या आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी स्वराज सेल स्थापन करण्याची योजना असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘आप’ची प्रतिमा मलिन झाली असून अनेकांनी बाहेरचा रस्ता धरला आहे. ते त्यांचे ‘कर्तृत्व’ आहे. केजरीवाल सरकार टिकले पाहिजे, अशी आपली सदिच्छा आहे. नैतिक आधार नसलेली, मात्र संख्याबळाच्या आधारावर अनेक सरकारे टिकली आहेत, त्यापैकीच एक दिल्ली सरकार आहे. अण्णा हजारे आमचे प्रेरणास्थान आहेत, त्यांचा आशीर्वाद आम्हाला हवा आहे. शेतक ऱ्यांच्या हितासाठी नरेंद्र मोदी यांच्याशीही आमची चर्चेची तयारी आहे, असे ते म्हणाले.

Story img Loader