‘स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी ‘हिंदुस्थान’ या शब्दाचा उपयोग केवळ आरएसएस किंवा हिंदू राष्ट्रवादी करत नव्हते. ‘हिंदुस्थान’ हा शब्द खरा ‘हिंदौस्ताँ’ असा असून देशातील धर्मनिरपेक्ष व्यक्तींकडून तो आवर्जून वापरला जाई. आज आपण तो शब्द भारतीय जनता पक्षास देऊन टाकला. हिंदुत्ववाद, विवेकानंद, राष्ट्रवाद, हिंदौस्ताँ सारे आपण भाजप व संघाला दिले. हे शब्द देशाची संपत्ती आहेत. अशाने आपल्याकडे काय उरेल,’ असा प्रश्न ‘जन स्वराज अभियान’चे प्रमुख योगेंद्र यादव यांनी उपस्थित केला. ‘डाव्या विचारसरणीचे लोक ही बाब मान्य करत नाहीत, पण विवेकानंदांना संघ परिवाराच्या सुपूर्द करणे हा मूर्खपणा आहे,’ असेही यादव म्हणाले.
प्रा. यशवंत सुमंत यांच्या पहिल्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध संस्था व मित्रपरिवारातर्फे सोमवारी यादव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी यादव बोलत होते. डॉ. राजा दीक्षित, किशोर बेडकिहाळ या वेळी उपस्थित होते.
‘‘भारत माता की जय’ ही हिंदुत्ववाद्यांची घोषणा नव्हती. स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढय़ाची ती प्रमुख घोषणा होती. एकीकडे ‘गळा चिरलात तरी ही घोषणा देणार नाही,’ असे विधान होते, आणि त्याच्या उत्तरादाखल ‘ही घोषणा न दिल्यास बाहेर काढू’ असे राज्याच्या विधिमंडळात सांगितले जाते. असा नियम कोणत्या संविधानात आहे? त्यानंतर ही घोषणा इस्लामविरोधी असल्याचा फतवा येतो. मूर्तिपूजा इस्लामविरोधी आहे, पण भारतमाता की जय म्हणणे इस्लामविरोधी कसे?,’ असे सांगून यादव म्हणाले, ‘सध्या सुरू असलेला राष्ट्रवादासंबंधीचा वाद दोन गटांमध्ये सुरू आहे, परंतु खरे तर यातील एकही गट राष्ट्रवादाचा वारस नाही. दोन्ही गटांवर युरोपच्या राष्ट्रवादाच्या परंपरेचा प्रभाव आहे. स्वत:ला ‘हिंदू राष्ट्रवादी’ म्हणवणाऱ्यांचा राष्ट्रवाद आयात केलेला आहे, तर त्याच्या विरोधात असलेल्यांचे ‘कॉस्मोपॉलिटनिझम’देखील आयात केलेले आहे. युरोपचा इतिहास हा विविधतेबरोबरच्या असामंजस्याचा इतिहास आहे. भारतीय राष्ट्रवाद मात्र नकारात्मकतेचे नव्हे तर एकीचे प्रतीक आहे.’
‘आपल्या गरीब, अशिक्षित लोकांच्या देशाने स्वीकारलेली लोकशाहीची संकल्पना, देशातील विविधता आणि शेवटच्या माणसाचे अश्रू पुसण्याच्या विकासाचा जन्मलेला विचार याचा मला अभिमान आहे. मागील ६५ वर्षांत त्या व्यक्तीचे अश्रू पुसले गेले नाहीत, त्यामुळे देशाच्या सद्यस्थितीबाबत अभिमान बाळगता येत नाही. सध्या सुरू असलेल्या राष्ट्रवादाबद्दलच्या चर्चेला केवळ गेल्या दोन महिन्यांच्या परिप्रेक्षात न पाहता गेल्या शंभर वर्षांच्या काळातील चर्चेच्या संदर्भात बघायला हवे. देशात जन्मलेल्या राष्ट्रवादाच्या विचाराशी जोडून राष्ट्रवादाची नवी व्याख्या तयार करायला हवी,’ असेही यादव यांनी सांगितले.
‘जेएनयूप्रकरणी विद्यार्थ्यांना समज देऊन पुरले असते’
यादव म्हणाले,‘जेएनयूचा विषय लहान आहे. प्रत्येक विद्यापीठात अशा घटना हाताळण्याची यंत्रणा असते. जिथे कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना समज देऊन भागले असते तिथे देशाचे गृहमंत्री उडी घेतात. चार विद्यार्थ्यांनी आक्षेपार्ह घोषणा दिल्या आणि आख्खा देश हालला? यातून जगासमोर देशाची काय प्रतिमा होते? या प्रकरणात आरोपीला न्यायालयाच्या आवारात, पोलिसांसमोर आणि प्रसारमाध्यमांसमोर मारहाण होते त्यातून देशाचा अभिमान कसा काय वाढला?’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा