गटबाजी, नाराजी, विस्कळीत कारभाराचे आव्हान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी शहर शिवसेना आणि बाबर परिवार, हे काही वर्षांपूर्वीपर्यंत अतूट समीकरण होते. बदलत्या राजकीय परिस्थितीत मात्र सगळीच गणिते बदलली आहेत. विभाजित बाबर परिवाराचा प्रभावही राजकारणातून कमी झाला आहे. माजी खासदार गजानन बाबर यांचा शिवसेनेशी काडीमोड झाल्यानंतर त्यांच्याच परिवारातील योगेश बाबर यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आली आहे. पक्षात आमदार व खासदारांची स्वतंत्र ‘संस्थाने’ आहेत. योगेश यांच्या नियुक्तीने नाराजीचा मोठा सूर आहे. त्यामुळे शहरप्रमुखांची वाटचाल अडथळय़ाची राहणार आहे.

शहरात शिवसेनेच्या स्थापनेपासून बाबर परिवाराचा दबदबा आहे. गजानन बाबर पिंपरी पालिकेवर शिवसेनेचे नगरसेवक म्हणून तीन वेळा निवडून आले. पालिकेतील विरोधी पक्षनेता, दोन वेळा आमदार, जिल्हाप्रमुख, खासदार अशी त्यांची जवळपास ४० वर्षांची शिवसेनेतील कारकीर्द आहे. याशिवाय, मधुकर बाबर, प्रकाश बाबर, शारदा बाबर असे तीन नगरसेवकही बाबर परिवाराने दिले. मावळ लोकसभेसाठी गजानन बाबरांनी शिवसेनेकडे दुसऱ्यांदा उमेदवारी मागितली, तेव्हा त्यांना नकार मिळाला. त्यामुळे संतापलेल्या बाबर यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली, मात्र जाता जाता त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले, त्याचे पडसाद शिवसेना वर्तुळात उमटले. या आरोपांमुळे ठाकरे प्रचंड नाराज झाले, ती नाराजी दूर झालीच नाही. या आरोपांचा बाबर यांना बराच पश्चात्ताप झाला. ठाकरे यांची माफी मागून पुन्हा पक्षात प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी बराच प्रयत्न केला. उद्धव यांच्या निकटवर्तीयांपैकी अनेकांना मध्यस्थीची विनंती त्यांनी केली, मात्र उद्धव यांची खप्पा मर्जी होण्याच्या धास्तीने कोणीही त्या फंदात पडले नाही.

गजानन बाबर यांनी शिवसेना सोडली तरी त्यांचे बंधू मधुकर व त्यांचा मुलगा योगेश शिवसेनेतच राहिले होते. तेथे त्यांना दुय्यम स्थान मिळत होते. पालिका निवडणुकीत योगेश यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारली, तेव्हा त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केली. त्यामुळे दोघेही पराभूत झाले. शिवसेनेत राहायचे नाही, असा निर्धार पितापुत्राने केला होता. त्यानुसार, भाजपमध्ये प्रवेशाच्या हालचाली त्यांनी सुरू केल्या. त्यांच्या भाजपप्रवेशाची खलबते सुरू असतानाच खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभा निवडणुकीचे गणित मांडून योगेश बाबर यांची शहरप्रमुखपदासाठी शिफारस केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogesh babar become chief of pimpri chinchwad shivsena