बेकायदेशीरपणे फलक लावू नका, शहर विद्रूप करू नका, फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई करा, माझा फोटो असला तरी ते फलक काढून टाका, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने मांडली, अशा फलकांवर व ते लावणाऱ्यांवर आयुक्तांनी तातडीने कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी नुकतेच दिले. मात्र, अजितदादांच्या आदेशाला त्यांच्याच पक्षाच्या शहराध्यक्षाने ‘केराची टोपली’ दाखवली आहे.
राष्ट्रवादीचे पिंपरीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांचा १४ जुलैला वाढदिवस होता. यानिमित्ताने त्यांच्या समर्थकांनी पिंपरी तसेच संत तुकारामनगर परिसरात मोठय़ा संख्येने शुभेच्छाफलक लावले आहेत. त्यामध्ये नगरसेवक, कार्यकर्ते, ठेकेदार, मंडळे असे अनेक शुभेच्छुक आहेत. महेशनगरचे कारंजे तसेच यशवंतराव चव्हाण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर फलकांची गर्दी झाली आहे. अजितदादा शुक्रवारी पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर होते. भोसरीतील कार्यक्रमात बोलताना, त्यांनी फलक तसेच फ्लेसविषयीची भूमिका नव्याने मांडली. शहर विद्रूप करू नका, बेकायदेशीरपणे फलक जाऊ नका. फ्लेस काढा, जाहिरातींमुळे खराब झालेल्या भिंती स्वच्छ करा, अशा सूचना केल्या. वेळप्रसंगी आयुक्तांनी संबंधितांवर कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी जाहीरपणे दिले होते. प्रत्यक्षात, दोनच दिवसांत त्या आदेशाची शहराध्यक्षांकडून पायमल्ली झाली आहे. बेकायदेशीर फलकांच्या विरोधात अजितदादा सातत्याने भाषणबाजी करत असताना राष्ट्रवादीचेच पदाधिकारी फारसे गांभीर्याने पाहत नाहीत. भोसरीत जेव्हा अजितदादा तळमळीने फ्लेक्सविषयी बोलत होते. तेव्हा व्यासपीठावर शहराध्यक्ष बहल उपस्थित होते. मात्र, त्यांच्याच मूकसंमतीने त्यांच्या पाठिराख्यांनी अजितदादांचे आदेश जागोजागी पायदळी तुडवले आहेत.