पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिळेकर यांच्यासह तिघांनी फायबर ऑप्टीकलचे काम करणाऱ्यास ५० लाखांची खंडणी मागितली असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असताना अशाप्रकारे भाजपा आमदारावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये टिळेकरांबरोबर त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे, रविंद्र बराटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत कात्रज-कोंढवा रोड या भागात फिर्यादी रवींद्र बराटे यांच्या कंपनीचे फायबर ऑप्टीक केबलचे काम चालू होते. त्या महिन्याभराच्या कालावधीत आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे यांनी त्यांना सतत फोन करून काम करू न देण्याची धमकी दिली. त्याला योग्य तो प्रतिसाद न दिल्याने तर ७ सप्टेंबर रोजी त्यांना फोनवरून ५० लाखाच्या खंडणीची मागणी केली. तर याप्रकरणी फिर्यादी रवींद्र बराटे यांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogesh tilekar and 3 others police case because demand of extortion of 50 lakhs
Show comments