देहू येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : ’जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग हे केंद्र सरकारच्या दलित, आदिवासी, मजूर यांचे कल्याण करणाऱ्या अंत्योदय योजनेचे मूर्त रूप, असे प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी श्रीक्षेत्र देहूमध्ये वैष्षव संवाद साधला. आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांची पूर्तता करताना वारसा आणि विकास हातात हात घालून पुढे गेले पाहिजेत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

 देहू येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार मारुतीबुवा कुऱ्हेकर, संत तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे आणि आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले या वेळी उपस्थित होते.

 ‘उच्च नीच काही नेणे भगवंतह्ण यासारख्या अभंगामधून संत तुकाराम महाराजांनी समाजामध्ये उच्च-नीच दृष्टिकोन, माणसा-माणसात भेद करणे हे पाप असल्याचे म्हटले आहे. त्यांचा हा उपदेश भगवद्भक्तीइतकाच राष्ट्रभक्तीसाठी महत्त्वाचा आहे. वारकरी बांधव हा संदेश घेऊन दरवर्षी वारीमध्ये भक्तीचा जागर घडवत असतात. हाच विचार घेऊन आमचे सरकारदेखील कोणताही भेदभाव न बाळगता आणि सर्वाना सोबत घेत प्रत्येक योजना पुढे नेत आहे, असे प्रतिपादन मोदी यांनी केले.

मोदी म्हणाले, काही महिन्यांपूर्वी मला पालखी मार्गावर दोन राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभले होते. ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे निर्माण पाच टप्प्यांत तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे. या पूर्ण कामात ३५० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा मार्ग तयार केला जाणार आहे. या कामासाठी ११ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे.

तुकाराम महाराजांनी १३ दिवसांची तपश्चर्या केली ती शिळा वैराग्याची साक्षीदार झालेली आहे. ही शिळा म्हणजे भक्ती आणि ज्ञानाची आधारशिळा आहे. शिळा मंदिरामुळे भारताचे सांस्कृतिक भविष्य प्रशस्त होणार आहे, असे सांगून मोदी म्हणाले, देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक असल्याचे श्रेय भारतातील संत परंपरा तसेच ऋषींना आहे. प्रत्येक युगामध्ये आपल्याकडे देश तसेच समाजाला दिशा देण्यासाठी कोणीतरी महान व्यक्ती आलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई या भावंडांच्या समाधीचे हे ७२५ वे वर्ष आहे. या महान व्यक्तींनी समाजाची शाश्वतता सुरक्षित करून भारताला गतिशील ठेवले आहे.

संत तुकाराम महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वातील दया, करुणा आणि सेवा त्यांच्या अभंगांच्या रूपात आपल्यासोबत आहे. या अभंगांनी आपल्या अनेक पिढय़ांना प्रेरणा दिली आहे. संत नामदेव, संत एकनाथ, संत सावता महाराज, संत नरहरी महाराज, संत सेना महाराज, संत गोरोबाकाका, संत चोखामेळा यांच्या अभंगांमधून आपल्याला नव्याने प्रेरणा मिळते. समाजात उच्च नीचतेचा भेदभाव करणे हे पाप आहे, असे संत तुकाराम सांगायचे. त्यांचा हा उपदेश भक्तीइतकाच राष्ट्रभक्ती तसेच समाजभक्तीसाठी महत्त्वाचा आहे. ‘सबका साथ सबका विकास, सबका विश्वास सबका प्रयास’ या मंत्रावर देशाची वाटचाल सुरू आहे. सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ कोणताही भेदभाव न करता सर्वानाच मिळत आहे. देशात महिला सबलीकरणासाठी प्रयत्न केला जात असून पंढरपूरची वारी ही संधीच्या समानतेचं प्रतीक आहे, असेही मोदी यांनी सांगितले.  नितीन महाराज मोरे यांनी प्रास्ताविक केले. तुषार भोसले यांनी आभार मानले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

पंचतीर्थाचा विकास

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थाचा विकास झाला आहे. आंबेडकर यांचे जन्मस्थळ असलेले महू, लंडनमधील त्यांच्या घराचे करण्यात आलेले स्मारकात रूपांतर, मुंबईतील चैत्यभूमीचे आणि नागपूरमधील दीक्षाभूमीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास करण्याचे काम असो किंवा दिल्लीमधील महापरिनिर्वाण झालेल्या ठिकाणी स्मारक निर्माण हे पंचतीर्थ नव्या पिढीला बाबासाहेबांची ओळख करून देत आहेत, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.

  • ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ हा अभंग कोरलेली संत तुकाराम महाराज पगडी, उपरणे देऊन संत तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांच्या हस्ते नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला.
  • आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष योगेश देसाई आणि पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा देऊन आणि तुळशीची माळ परिधान करून पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला.

भिन्न परिस्थितीत समजाला गती देण्याचे काम संतांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषाच्या जीवनात संत तुकाराम महाराज यांनी प्रेरणा दिली. तुरुंगामध्ये असताना स्वातंत्र्यवीर सावरकर हे संत तुकाराम महाराजांचे अभंग गात असत. कालखंड वेगवेगळा असला तरी या दोघांसाठी संत तुकाराम महाराज यांची वाणी आणि ऊर्जा प्रेरणादायी ठरली आहे.  – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

अजित पवारांना डावलल्याने राज्याचा अपमान -सुप्रिया सुळे

अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथे संत तुकाराम यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. परंतु, या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांना भाषणासाठी संधी देणे हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. पण, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या कार्यक्रमात त्यांना भाषण करू देण्याविषयीचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता, पण तो नामंजूर करण्यात आला. अजित पवार यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही.