पुणे : पुण्यातील ‘यो स्काईज एव्हिएशन इन्स्टिट्यूट’ने स्वदेशी बनावटीचा ‘एअरबस ए ३२० फ्लाइट सिम्युलेटर’ विकसित केला आहे. या सिम्युलेटरद्वारे प्रशिक्षणार्थी वैमानिकांना विमान चालवण्याच्या सरावासाठीची अत्याधुुनिक सुविधा उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे, या सिम्युलेटरचा उत्पादन खर्च आयात केलेल्या सिम्युलेटरपेक्षा कमी आहे.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या सिम्युलेटरचे उद्घाटन करण्यात आले. यो स्काईज एव्हिशन इन्स्टिट्यूटचे संस्थापक संचालक स्क्वॉड्रन लीडर (नि.) अजय परांजपे आणि संचालिका कॅप्टन तृप्ती कर्नावट, जीतो अपेक्सचे अध्यक्ष विजय भंडारी, जीतो अपेक्सचे संचालक राजेंद्र जैन, कृष्णकुमार गोयल, बढेकर ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण बढेकर, उद्योजक राजेंद्र मुथा, चाकण इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मोतीलाल सांकला, एमआयटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवि चिटणीस, जेडब्ल्यूचे संचालक उमेश जोशी या वेळी उपस्थित होते. या सिम्युलेटरविषयीची माहिती मोहोळ यांना देण्यात आली. तसेच मोहोळ यांनी या सिम्युलेटरद्वारे विमान चालवण्याचा अनुभवही घेतला.

परांजपे म्हणाले, संपूर्णतः स्वदेशी पद्धतीने सिम्युलेटर डिझाइन केल्यामुळे त्याचा उत्पादन खर्च आयात केलेल्या सिम्युलेटरच्या तुलनेत ७५ टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनाही अत्यंत माफक दरात हा विमान चालवण्याचा अनुभव घेता येऊ शकतो. सिम्युलेटर पूर्णतः अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी डिझाइन आणि तयार केला आहे. तर यो स्काईजने तो विकसित केला आहे.

प्रशिक्षणार्थी वैमानिकांना प्रात्यक्षिक महत्त्वाचे असते. त्या दृष्टीने हा सिम्युलेटर महत्त्वाचा आहे. या माध्यमातून वैमानिकाला सर्व तांत्रिक अनुभव घेता येतो. गेल्या तीन वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने दोन प्रकारचे सिम्युलेटर विकसित करण्यात आले आहेत. देशात आतापर्यंत परदेशी सिम्युलेटर आयात करण्यात येत होते. मात्र, पहिल्यांदाच स्वदेशी बनावटीचा सिम्युलेटर विकसित करण्यात आला आहे, असे कर्नावट यांनी नमूद केले.