पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहरात अनेक सांस्कृतिक उपक्रम होत असतात. सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात नाट्यगृह, सांस्कृतिक केंद्र, सुरू करण्यात आली आहेत.

सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने स्वतंत्र असा सांस्कृतिक विभाग कार्यरत आहे. या विभागाच्या माध्यमातून शहरातील सर्व सांस्कृतिक केंद्र, नाट्यगृह, कलादालन यांचे नियोजन केले जाते. आता पर्यंत या सांस्कृतिक विभागाचा संपूर्ण कारभार हा कागदांच्या आधारावर केला जात होता. बदलत्या काळानुसार अपडेट होण्याचा ध्यास सांस्कृतिक विभागाने घेतला असून त्याचे पहिले पाऊल म्हणून ‘ रंगयात्रा ‘ हे मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे.

महापालिकेच्या सांस्कृतिक केंद्र विभागाच्या वतीने नाट्यगृहे आणि सांस्कृतिक केंद्रांमधील ऑनलाइन बुकिंगसाठी ‘रंगयात्रा’ हे मोबाइल ॲप तयार करण्यात आले आहे. यामुळे शहरातील सर्व नाट्यगृहांचे ऑनलाइन बुकिंग, उपलब्ध तारखा, तसेच आसनक्षमता यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

पुणे महापालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त हे मोबाइल ॲप तयार करण्यात आले आहे. ‘रंगयात्रा’ या नवीन विकसित केलेल्या मोबाइल ॲपच्या माध्यमातून सांस्कृतिक केंद्र विभागाकडे सर्व कामकाज ऑनलाइन पद्धतीने संगणक प्रणालीमधून कामे केली जाणार आहेत. या संगणकप्रणालीद्वारे संपूर्ण पुण्याबाहेरील नागरिकांना नाटक, लावणी, सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक संस्था यांना सर्व १५ नाट्यगृहांची माहिती, आसनक्षमता, सोयी-सुविधा, पत्ता ही माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

शहरातील नाट्यगृहांची उपलब्धता यामधून तपासता येणार आहे. तसेच नाट्यगृहांचे भाडे ऑनलाइन पेमेंट पद्धतीने घरबसल्या भरता येणार आहे. ऑनलाइन संगणक प्रणाली आणि मोबाइल ॲपमुळे सर्व नाट्यगृहांमध्ये कार्यक्रमांसाठी नाट्यगृह आरक्षित करण्याच्या कामकाजामध्ये पारदर्शकता येणार आहे, असे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

आता पर्यंत नागरिकांना तसेच विविध सांस्कृतिक संस्थांना महापालिकेच्या नाट्यगृहात अथवा सांस्कृतिक केंद्रात कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर प्रत्यक्ष उपस्थित राहून माहिती घ्यावी लागत होती. मात्र या नवीन ॲपमुळे घरबसल्या ही माहिती उपलब्ध होणार आहे. यामुळे आयोजकांच्या आणि नागरिकांचा त्रास कमी होणार असल्याचा दावा महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नाट्य , लावणी , सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजक , राजकीय, शैक्षणिक , धार्मिक संस्था आणि नागरिक यांनी १ मे २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधी आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी १५ मार्च ते २५ मार्च या कालावधीमध्ये रंगयात्रा या मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे नाट्यगृहांच्या आरक्षण आरक्षणाकरता अर्ज सादर करावे, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Story img Loader