पुणे : अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या सनदी लेखाकार (सीए) तरुणीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ॲना सेबास्टियन पेरायिल (वय २६) असे या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी अखेर ईवाय इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमानी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. अशी घटना पुन्हा घडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.

ईवायच्या पुणे कार्यालयात ॲना यंदा १८ मार्चला रुजू झाली होती. तिचा २० जुलैला मृत्यू झाला. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचे समजते. तिची आई अनिता ऑगस्टिन यांनी याबाबत एक सविस्तर ई-मेल ईवाय इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमानी यांना पाठविला होता. तो समाजमाध्यमांत व्हायरल झाला होता. त्यात ॲनाचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. याचबरोबर ॲनाच्या अंत्यसंस्काराला कंपनीतील एकही व्यक्ती उपस्थित राहिली नसल्याकडेही लक्ष वेधण्यात आले होते.

हे ही वाचा…पुणे : शहरात चंदन चोरट्यांचा धुमाकूळ- लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यात चंदन चोरी

या पार्श्वभूमीवर ईवाय इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमानी यांनी घडलेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त करणारी पोस्ट समाज माध्यमावर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अॅनाच्या मृत्यूमुळे मला अतीव दु:ख झाले आहे. तिच्या आईच्या दु:खाची मी केवळ कल्पनाच करू शकतो. अॅनाच्या अंत्यसंस्काराला मी उपस्थित राहू शकलो नाही, याचा मला खेद आहे. हे आमच्या संस्कृतीला साजेसे नाही. हे आधी कधीही घडले नव्हते आणि पुढेही अशी घटना घडणार नाही.

अॅनाच्या आईने काय म्हटले होते?

अॅनाची आई अनिता ऑगस्टिन यांनी ई-मेलमध्ये म्हटले आहे, की ॲनाची ही पहिलीच नोकरी होती. त्यामुळे ती सुरुवातीला खूप उत्साहित होती. मात्र, कंपनीत रुजू झाल्यानंतर चारच महिन्यांत तिचा मृत्यू झाला. तिच्यावर कामाचा अतिताण होता. ती रात्री उशिरा आणि साप्ताहिक सुटीलाही काम करीत असायची. कंपनीत नवीन असल्याने तिच्यावर कामाचा खूप बोजा टाकण्यात आला होता. तिचे व्यवस्थापक ऐनवेळी तिच्यावर कामाची जबाबदारी टाकत होते. त्यामुळे ती कायम तणावाखाली असायची.

हे ही वाचा…पिंपरी- चिंचवड: बहिणीच्या प्रियकराची भावाने केली हत्या; तीन जण ताब्यात, आज सकाळीच आढळला होता मृतदेह

ईवाय इंडियाचे म्हणणे काय?

ईवाय ग्लोबलची सदस्य कंपनी एस. आर. बाटलीबोईमधील लेखापरीक्षण विभागात ॲना काम करीत होती. तिची कंपनीतील कारकीर्द दु:खदपणे अचानक संपली. यामुळे कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. तिच्या कुटुंबीयांना आम्ही सर्वतोपरी सहकार्य करीत आहोत. तिच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेले मुद्दे आम्ही अतिशय गंभीरपणे घेतले आहेत. भारतात ईवायच्या सदस्य कंपन्यांत १ लाख कर्मचारी कार्यरत असून, त्यांच्या हिताला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे ईवाय इंडिया कंपनीने म्हटले आहे.