पुणे : अविवाहित असल्याची बतावणी करुन फसवणूक केल्याने डाॅक्टर तरुणीने विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. याप्रकरणी सांगलीतील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाची विवाह नोंदणी संकेतस्थळावरुन तरुणीची ओळख झाली होती. विवाहाच्या आमिषाने त्याने तरुणीकडून दहा लाख रुपये उकळले होते.
याप्रकरणी बिबवेवाडीव पोलिसांनी सांगलीतील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर एका २५ वर्षीय डाॅक्टर तरुणीने बिबवेवाडी भागातील दवाखान्यात ७ जानेवारी राेजी विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केली होती. याबाबत तरुणीच्या वडिलांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>>सराइतांकडून सात पिस्तुलांसह ११ काडतुसे जप्त; पोलिसांच्या तत्परतेमुळे सराइतांचा डाव फसला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डाॅक्टर तरुणीने एका विवाह विषयक संकेतस्थळावर नाव नोंदणी केली होती. आरोपी तरुणाने संकेतस्थळावर नोंदणी केली होती. तो विवाहित होता. मात्र, त्याने नोंदणी करताना अविवाहित असल्याचे भासविले होते. डाॅक्टर तरुणीशी त्याने संपर्क साधून विवाहास उत्सुक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दोघांची देहू परिसरातील एका दवाखान्यात भेट झाली. मात्र, आरोपी तरुणाचे वागणे चांगले न वाटल्याने त्याला तरुणीच्या कुटुंबीयांनी नकार कळविला. त्यानंतर आरोपीने पुन्हा डाॅक्टर तरुणीशी संपर्क साधून तिला जाळ्यात ओढले.
त्याने डाॅक्टर तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेळोवेळी दहा लाख रुपये घेतले. तरुणीने त्याच्याकडे पैसे मागितल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा आरोपी तरुणााने विवाहित असल्याचे सांगितले. पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. डाॅक्टर तरुणीला मानसिक धक्का बसला. डाॅक्टर तरुणीने बिबवेवाडी भागातील दवाखान्यात विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केली. तरुणीच्या वडिलांनी नुकतीच पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव तपास करत आहेत.