पुणे : ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणूक करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. सायबर चोरट्यांनी ऑनलाइन टास्कच्या आमिषाने तरुणीसह दोघांची ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी काही दिवसांपूर्वी संदेश पाठविला होता. घरातून काम करण्याची संधी उपलब्ध, असे संदेशात म्हटले होते. चोरट्यांनी तरुणीला आमिष दाखवले.
समाजमाध्यमातील मजकूर, ध्वनिचित्रफितीस दर्शक पसंती (व्हयुज) मिळवून दिल्यास चांगले पैसे मिळतात, असे सांगून तरुणीला जाळ्यात ओढले. सुरुवातीला तरुणीला चोरट्यांनी काही पैसे दिले. त्यानंतर या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून चोरट्यांनी तिच्याकडून वेळोवेळी १३ लाख २७ हजार रुपये घेतले. त्यानंतर चोरट्यांनी तरुणीला परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ढवळे तपास करत आहेत.
दरम्यान, ऑनलाइन टास्कच्या आमिषाने एका तरुणाची १८ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारदार तरुण हडपसर भागातील मगरपट्टा सिटी परिसरात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइलवर संदेश पाठविला होता. ऑनलाइन टास्कच्या आमिषाने चोरट्यांनी तरुणाकडून वेळोवेळी १८ लाख ७० हजार रुपये घेतले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वास डगळे तपास करत आहेत.