पुणे: मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पुलावरुन रविवारी रात्री एका तरुणीने उडी मारली. वाहतूक पोलीस तसेच नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे ५० फूट उंचीवरुन उडी मारल्यानंतर तरुणी बचावली. तरुणी सतरंजीवर पडल्याने ती बचावली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. नैराश्यातून तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
नवले पुलावर रविवारी रात्री २४ वर्षीय तरुणी थांबली होती. ती जोरात ओरडत होती. तिचा आवाज नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी ऐकला. वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी मिथून राठोड, अमर कोरडे, नागरिक राजू जगताप, सागर बर्दापुरे, प्रदीप जोरे, श्रेयस तांबे यांनी तरुणीला उडी मारु नको, असे सांगितले. प्रसंगावधान राखून पोलीस आणि नागरिकांनी नवले पूल परिसरातील एका हाॅटेलमधून सतरंजी आणली. पोलीस आणि नागरिक सतरंजी धरून ते थांबले. तिला वाचविण्याासाठी काही जण पुलाकडे निघाले. तेवढ्यात तरुणीने पुलावरुन उडी मारली. ती सतरंजीवर पडली. या घटनेत तरुणीला किरकोळ दुखापत झाली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणीने प्रेमप्रकरणातून नवले पुलावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.