पीएमपी बस चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने प्रवासी तरूणी खाली पडल्याने तिचा पाय फ्रॅक्चर झाल्याची घटना घडली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांकडून बस चालकाच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीएमपी बसचालक अर्जुन प्रभाकर मुंढे (वय २५, रा. आळंदी-देहू फाटा ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा गंगाधर गायकवाड (वय २९, रा. भैरवननगर, धानोरी) असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे.
गायकवाड पीएमपी बसमधून तरुणी प्रवास करत होती. भरधाव वेगाने बस विश्रांतवाडी रस्त्याने निघाली होती. सावंत पेट्रोल पंपाजवळ बसचालक मुंढे याने अचानक ब्रेक दाबला. त्या वेळी गायकवाडचा तोल गेला आणि ती बसमधून खाली पडली. त्या वेळी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन महिला प्रवाशांचाही तोल जाऊन त्या गायकवाडच्या अंगावर पडल्या. गायकवाडच्या पायाला दुखापत झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा तिचा पाय फ्रॅक्चर झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पीएमपी चालकाने भरधाव वेगाने बस चालविल्याने दुखापत झाल्याचे गायकवाडने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंगे तपास करत आहेत.