पुणे : दुचाकीस्वार आणि साथीदार तरुणाने पीएमपी बसवर दगडफेक करुन काच फोडल्याची घटना रास्ता पेठेतील कादरभाई चौकात घडली. पीएमपी चालकाला धक्काबुक्की करुन दुचाकीस्वार साथीदारासह पसाार झाला.याबाबत पीएमपी चालक गणेश जगताप (वय ४२, रा. हडपसर) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वारासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या मााहितीनुसार, पुणे स्टेशन ते स्वारगेट या मार्गावरील पीएमपी बस ३ एप्रिल रोजी दुपारी दीडच्या सुमारास रास्ता पेठेतील नेहरु रस्त्याने निघाली होती.
कादरभाई चौकात अचानक दुचाकीस्वार पीएमपी बससमोर आल्याने बस चालक जगताप यांनी बस थांबविली. त्या वेळी दुचाकीस्वार तरुणाने बससमोर दुचाकी आडवी लावली. त्याने रस्ता अडवून वाद घालण्यास सुरुवात केली. बसचालक जगताप यांना मारहाण केली. वाहतूक विस्कळीत झाल्याने जगताप यांनी बस रस्त्याच्या कडेला नेली. त्यानंतर दुचाकीस्वार तरुणाने साथीदाराला बोलावून घेतले. दोघांनी बसवर दगडफेक केली. दगडफेकीत बसच्या दर्शनी भागाची काच फुटली. पसार झालेल्या दुचाकीस्वार तरुणासह साथीदाराचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस कर्मचारी प्रमोद दराडे तपास करत आहेत.