पुणे : तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील तीन लाख रुपयांची रोकड लुटण्यात आल्याची घटना लक्ष्मी रस्त्यावर घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबाबत सिंटुकुमार विजय सिंह (वय २१, रा. शिरुर, जि. पुणे) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिंह मूळचा बिहारचा आहे. तो शिरुर परिसरातील एका खासगी कंपनीत कामाला आहे. त्याचा विवाह ठरला आहे. तो रेल्वेने गावी जाणार होता. मात्र, त्याचे रेल्वे प्रवासाचे तिकिट निश्चित झाले नव्हते. रेल्वे स्थानकावर दोघांनी त्याला गाठले. आरक्षित तिकिट देण्याचे आमिष त्याला दाखविले. त्यानंतर दोघांनी त्याला रिक्षातून गणेश पेठ परिसरात नेले. लक्ष्मी रस्त्यावरील डुल्या मारुती चौकात त्याला मारहाण केली. त्याला धमकावून डेबिट कार्ड, तसेच सांकेतिक शब्द घेतला. त्याच्या खिशातील वीस हजारांची रोकड लुटून चोरटे पसार झाले, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांनी दिली.

हे ही वाचा…पुणे : गणेशोत्सव खरेदीसाठी गर्दी; बेशिस्तीमुळे वाहतूक कोंडीत भर

त्यानंतर चोरट्यांनी सिंह याच्या बँक खात्यातून दोन लाख ८० हजार रुपये काढून घेतले. सिंह याचा विवाह ठरल्याने तो गावी निघाला होता. त्याच्या वडिलांचा अपघात झाल्याने गडबडीत गावी निघाला होता. सासऱ्यांनी त्याला खरेदीसाठी पैसे दिले होते. ऑनलाइन पद्धतीने पैसे सिंह याच्या खात्यात जमा करण्यात आले होते. चोरट्यांनी सिंह याच्या खात्यातील पैसे त्यांच्या खात्यात हस्तांतरित केले आहेत. सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे तपास करत आहेत.