लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: मैत्रिणीला खूश करण्यासाठी घरफोड्या करणाऱ्या हरियाना देथील चोरट्याला चंदनगर पोलिसांनी अटक केली. दिवसा शेफचे काम करून रात्री बंद असलेल्या कार्यालयांवर तो डल्ला मारत असे.
फुरकान नईम खान (वय २१, रा. पानिपत, हरियाना) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून चार गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी चोरी केलेले भारतीय आणि परकीय चलन जप्त केले आहे.
आणखी वाचा-पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी खुशखबर! निजामुद्दीन-मिरज एक्स्प्रेसला आणखी चार थांबे
खराडी येथील सिनॅप्स लॅब्स प्रा. लि. कंपनीच्या कार्यालयामध्ये ७ ऑगस्ट रोजी चोरी झाली होती. चोरट्याने तेथून तीन लाख सात हजार ४९२ रुपयांचे भारतीय आणि परकीय चलन चोरी केले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर पवन चव्हाण (वय ३०) यांनी याबाबत चंदनगर पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार अज्ञात आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना, तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारामार्फत सुभाष आव्हाड आणि विकास कदम यांना खान याच्याबद्दल माहिती मिळाली होती. त्यानेच ही घरफोडी केली असून सध्या तो पिंपरी-चिंचवड येथे असल्याचे समजले. त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच इतर चार ठिकाणी अशाच प्रकारे चोरी केल्याचे सांगितले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे, अरविंद कुमरे कर्मचारी सचिन कुटे, अविनाश संकपाळ, सचिन रणदिवे, सुहास निगडे, महेश नाणेकर, विकास कदम यांच्या पथकाने केली.
आणखी वाचा-पुण्यात महाराष्ट्र सायन्स काँग्रेस सुरू होणार
दिवसा शेफ अन् रात्री घरफोड्या..
खान हा शहरातील एका उपाहारगृहामध्ये शेफ म्हणून काम करतो. तर, रात्रीच्या वेळी तो घरफोड्या करत होता. बंद असलेली कार्यालये शोधून डल्ला मारण्यात तो पटाईत आहे. पाईपच्या साह्याने इमारतीवर चढून जात तो स्वच्छतागृहाच्या खिडकीच्या काचा काढून आत प्रवेश करत होता. त्याने चोरी केलेले पैसे आपल्या मैत्रिणीला खूश करण्यासाठी उडवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.