माझ्या पत्नीकडे माझ्या अंतिम संस्कारासाठी पैसे नाहीत. माझा अंतिम संस्कार शवदाहिनीत करा. गणेश आणि श्रावणी दोघे मिळून रहा. गणेश आपल्या छोटीला सांभाळ. मम्मीला त्रास देऊ नका आणि घरात जे बनवतील तेच खा…अशा आशयाची सुसाईड नोट लिहून राजू नारायण राजभर या तरुणाने सावकाराला कंटाळून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटने प्रकरणी निगडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. राजू कुमार आणि रजनी सिंग अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेजण फरार आहेत. त्यांचा शोध निगडी पोलीस घेत आहेत. आत्महत्यापूर्वी राजू नारायण राजभर यांनी व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू राजभर यांनी कुमार राजू, रजनी सिंग, महादेव फुले आणि हनुमंता गुंडे यांच्याकडून दहा टक्के व्याजाने काही पैसे घेतले होते. हे पैसे परत केलेले असताना देखील राजू यांच्याकडे आरोपी हे व्याजाच्या पैशासाठी तगादा लावत होते. हेच पैसे फेडण्यासाठी राजू यांनी वेगवेगळ्या बँकेतून आणि फायनान्स कंपनीकडून कर्ज काढलं होतं. बँक आणि फायनान्स चे पैसे भरू न शकल्याने त्यांचे देखील फोन येत होते. याच दरम्यान चारही आरोपी घरात घुसून जिवे मारण्याची धमकी आणि मुलांना उचलून घेऊन जाऊ अस वारंवार म्हणत होते. काही मित्रांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. परंतु, या प्रकरणात राजू हे अडकत गेले आणि याचा त्रास सहन झाल्याने त्यांनी त्यांचं आयुष्य संपवल आहे. आत्महत्येपूर्वी राजू यांनी एक व्हिडिओ बनवला असून सुसाईड नोट लिहिली आहे. त्यामध्ये आरोपींचा उल्लेख करण्यात आला आहे. सुसाईड नोट मध्ये “मी माझ आयुष्य संपत आहे. माझ्या बायकोने मला खूप साथ दिली. मी माझ्या बायकोची मुलाची आणि मुलीची क्षमा मागतो. माझ्या अंतिम संस्कार करण्यासाठी माझ्या पत्नीकडे पैसे नाहीत. हे मला माहित आहे. म्हणून, मला शवदाहिनीत जाळा.” असा सुसाईड नोट मध्ये उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेनंतर निगडी पोलिसांनी महाराष्ट्र सावकार अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.