लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सोमवार पेठेत घडली. तरुणाला धमकावून त्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी दोनजणांविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दीपक चंपालाल राजपुरोहित ( वय २५, रा. साईकृपा सोसायटी, सोमवार पेठ ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दीपकने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. त्यानंतर दीपकचे वडील चंपालाल यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दीपक याने बेकायदा सावकारी करणाऱ्या काही जणांकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्याची परतफेड करणे त्याला शक्य होत नव्हते. त्यामुळे गुंड प्रवृत्तीचे सावकारांनी त्याला मानसिक त्रास देऊन धमकावले होते. त्यांच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे दीपकचे वडील चंपालाल यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
आणखी वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ जानेवारीला आदिवासींशी साधणार संवाद
पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. समर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ज्योती कुटे तपास करत आहेत.