पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवडमध्ये नवरदेवाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे लग्न सोहळ्यात शोककळा पसरली आहे. सुरज राजेंद्र रायकर असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. आज पहाटेपासून सुरज हा घरातून बेपत्ता होता. त्यानंतर आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास विहिरीतून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. “मला लग्न करायचं नाही. मी आत्महत्या करत आहे” असा मॅसेज त्याने आत्महत्यपूर्वी मामाला केला होता. अशी माहिती तळेगाव पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरजचा आज विवाह सोहळा होता. त्यासाठी पै- पाहुणे आले होते. परंतु, लग्न करायचं नसल्याने सुरज पहाटे पाच वाजल्यापासून बेपत्ता होता. नवरदेवच गायब असल्याने कुटुंबासह नातेवाईक सुरजचा सर्वत्र शोध घेत होते. सकाळी सुरज चा मोबाईल आणि दुचाकी तळेगाव परिसरातील वाण्याचा मळा या ठिकाणच्या विहिरीजवळ आढळली.
आणखी वाचा-भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील जुन्या लाकडी वाड्याला आग
याबाबतची माहिती तळेगाव पोलिसांना नातेवाईकांनी दिली. सूरजचा शोध घेऊन काही तासातच त्याचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला आहे. सुरजने आत्महत्येपूर्वी मामाला “मला लग्न करायचं नाही मी आत्महत्या करत आहे.” असा मेसेज केला होता. अशी माहिती तळेगाव पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास तळेगाव पोलीस करत आहेत.