पुणे : विवाहास नकार दिल्याने तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात नुकतीच घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणे, तसेच त्याच्याकडून वेळोवेळी पैसे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका तरुणीविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.गणेश राजू सिंग (वय ३०, रा. गोसावी वस्ती, वैदुवाडी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सिंग याची विवाहित बहीण गौरी राजेंद्र कांबळे (वय ३३, रा. इंदिरानगर, ससाणेनगर, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश आणि त्याची आई वैदुवाडी भागात राहायला आहेत. त्याची आई मगरपट्टा भागात घरकाम करुन उदरनिर्वाह करते. गणेश हा शेवाळवाडीतील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या थांब्यावर पाण्याच्या बाटल्यांची विक्री करायचा. त्याच्या घराशेजारी तरुणी राहायला आहे. गेल्या चार वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. दोघांनी कुटुंबीयांना विवाह करणार असल्याचे सांगितले होते.

ती नेहमी गणेशकडून कपडे खरेदीसाठी पैसे घ्यायची. ती घरातील किराणा माल भरण्यासाठी त्याच्याकडून पैसे घ्यायची. तरुणी एका व्यायामशाळेत कामाला होती. तिला सोडायला तो दररोज सकाळी जायचा. तिने दुचाकी घेतली होती. दुचाकीचे हप्ते तो भरत होता. किरकोळ कारणावरुन ती त्याला त्रास द्यायची. गणेशच्या मित्रांनी तिला समजावून सांगितले होते. काही दिवसांपासून तिने गणेश याच्याशी बोलणे सोडले होते. गणेशला तिने झिडकारले होते. तेव्हापासून गणेश नैराश्यात होता. ७ फेब्रुवारी रोजी गणेश घरी रडत होतात. तरुणीमुळे मी कर्जबाजारी झाल्याचे त्याने कुटुंबीयांना सांगितले, असे गणेशची विवाहित बहीण गौरी कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानंतर गणेश घरातून तो निघून गेला. तो बेपत्ता झाल्याची तक्रार वानवडी पोलिसांकडे देण्यात आली होती. गणेशने हडपसर भागात धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. त्यानंतर वानवडी पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटविली. त्यानंतर त्याच्या बहिणीने पोलिसांकडे तक्रार दिली. गणेशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे तपास करत आहेत.