पुणे : पत्नीशी अश्लील वर्तन केल्याने तरुणाचा खून करणाऱ्या तरुणास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. पुणे स्टेशन परिसरात तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. कोणतेही धागेदोरे नसताना बंडगार्डन पोलिसांनी खून प्रकरणाचा उलगडा केला. सूजरज आगवान (वय ३५, मूळ रा. राजपूर, जि. कानपूर, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
गेल्या महिन्यात १४ जून रोजी पुणे स्टेशन परिसरातील रेल्वे वसाहतीजवळ एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून चेहरा दगडाने ठेचण्यात आला होता. बंडगार्डन पोलिसांनी खून प्रकरणाचा तपास सुरु केला होता. खून प्रकरणात पोलिसांना कोणतेही धागेदोरे मिळाले नव्हते. बंडगार्डन पोलिसांनी मालधक्का चौक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले होते. १३ जून रोजी मालधक्का चौकातील एका मद्य विक्री दुकानाजवळ एक महिला आणि तरुण बोलत थांबल्याचे चित्रीकरणात आढळून आले होते. पोलिसांनी महिलेचा शाेध घेण्यास सुरुवात केली.
५ जुलै रोजी महिलेचा ठावठिकाणा समजला. पोलिसांनी तिची चौकशी केली. चौकशीत खून झालेल्या तरुणाने महिलेशी अश्लील वर्तन केले होते. त्यानंतर महिलेच्या पतीने तरुणाला मालधक्का चौकातील रेेल्वे वसाहत परिसरात नेले. तेथे त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती तपासात मिळाली. पोलिसांनी आरोपी सूरज आगवानला पकडले. बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक संदीप मधाळे, रवींद्र गावडे, ज्ञानेश्वर गायकवाड, विलास केकाण, शरद ढाकणे, शिवाजी सरक, मनोज भोकरे, अनिल कुसाळकर, किरण तळेकर आदींनी ही कारवाई केली.