लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. तरुणाच्या खून प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एकाला अटक केली. नवी पेठेतील राजेंद्रनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) वसाहतीत ही घटना घडली.

आनंद परमेश्वर डोलारे (वय ३०, रा. एसआरए वसाहत, राजेंद्रनगर, नवी पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मन्या साेनावणे (रा. राजेंद्रनगर) याला अटक करण्यात आली. याबाबत आनंद डोलारेची आई वनिता (वय ५७) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद याला दारुचे व्यसन आहे. ५ जानेवारी रोजी तो कामावरुन रात्री घरी आला. दारु पिऊन तो वसाहतीच्या परिसरात थांबला होता. आरोपी मन्या याने आनंदला हातउसने पैसे दिले होते. त्याने आरोपीला पैसे दिले नव्हते. त्यामुळे तो त्याच्यावर चिडला होता.

आणखी वाचा-पुणे : बाह्यवळण मार्गावरील नऱ्हे परिसरात जड वाहनांना बंदी

रात्री साडेआठच्या सुमारास आनंद वसाहतीत थांबला होता. त्यावेळी मन्या तेथे आला. हातउसने दिलेल्या पैशांवरुन दोघांमध्ये वाद झाला. आरोपीने त्याला दांडक्याने बेदम मारहाण केली. आरोपीने आनंदला उचलटून जमिनीवर आपटल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या आनंदला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. खून केल्याप्रकरणी आरोपी मन्याला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप खाडे तपास करत आहेत.

Story img Loader