पुणे : रोगप्रतिकारकशक्ती कमी करणारा ‘कॉमन व्हेरिएबल इम्युन डिफिशिअन्सी’ (सीव्हीआयडी) आणि रोगप्रतिकारक शक्तीकडून चुकून आपल्याच लाल रक्तपेशींवर हल्ला होणारा ‘ऑटोइम्युन हिमोलिटिक ॲनिमिया’ (एआयएचए) या दुर्मीळ आजाराने त्रस्त असलेल्या २० वर्षीय तरुणाला स्वतःच्या पेशी वापरून ‘ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट’ करून पुण्यातील रक्तविकारतज्ज्ञांनी नवजीवन दिले.
पुण्यातील वाघोली येथे राहणारा सुमीत (नाव बदललेले) हा २०२० मध्ये १६ वर्षांचा असताना, त्याचे दर सहा ते सात महिन्यांनी हिमोग्लोबिन कमी व्हायचे. अखेर तो यशोदा हिमॅटोलॉजी क्लिनिकमध्ये रक्तविकारतज्ज्ञ डॉ. विजय रमणन यांच्याकडे गेला. त्यांनी त्याला हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी इंजेक्शन दिले. परंतु, चार महिन्यांनंतर सुमीत पुन्हा त्याच तक्रारींसह परत आला. या वेळी त्याचे फक्त हिमोग्लोबिनच नव्हे, तर रक्ताच्या गाठी तयार करणाऱ्या प्लेटलेटची संख्याही कमी झाली होती. त्याचबरोबर त्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही ६०० पर्यंत गेले होते. ज्यामुळे त्याला टाइप-१ मधुमेहाचे निदान झाले. पुढील तपासणीत त्याला ‘सीव्हीआयडी’ असल्याचे समोर आले, जो एक आनुवंशिक रोग आहे.
डॉ. रमणन यांनी सुमीतवर साखर नियंत्रणात आणण्यासाठी इन्शुलिन उपचार सुरू केले आणि ‘सीव्हीआयडी’ व ‘एआयएचए’साठी ‘ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट’ केले. या प्रक्रियेत रुग्णाच्या अस्थिमज्जेमधून पेशी घेऊन रुग्णावर प्रत्यारोपित केल्या जातात. यानंतर रुग्णाची प्लेटलेट संख्या सामान्य होण्यास मदत झाली. याचबरोबर मधुमेहाचा त्रास कमी होऊन आणि हिमोग्लोबिन पातळीही वाढली. हिमोग्लोबिन पातळी पूर्ववत न झाल्याने त्याला अतिरिक्त इंजेक्शन उपचार सुरू करण्यात आले. दर चार-पाच महिन्यांनी नियमित उपचार घेतल्यानंतर तो पूर्णपणे बरा झाला आहे. आता तो अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन शिक्षणही घेत आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
कॉमन व्हेरिएबल इम्युन डिफिशिअन्सी हा मुलांमध्ये आढळणारा एक आनुवंशिक विकार आहे. याच्या निदानासाठी नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग (एनएसजी) चाचणी करावी लागते. टाइप-१ मधुमेहाच्या रुग्णामध्ये निदानानंतर एका वर्षाच्या आत ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट केल्यास ते प्रभावी ठरू शकते. -डॉ. विजय रमणन, रक्तविकारतज्ज्ञ, यशोदा हिमॅटॉलॉजी क्लिनिक